नऊ कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
कोलकातास्थित नऊ कलाकारांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या कलाकृतींचं ‘मेनी फॉर्मस, मेनी आयडीयाज’ हे कलाप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, ऑडेटोरीयम हॉल. १६१ – बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे मांडण्यात आलं असून ते २९ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

या सामूहिक प्रदर्शनाव्दारे हे कलाकार राज्यातील कलात्मकता आणि कला परंपरा यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भिन्न कला पद्धती, तंत्र आणि संकल्पना यांचा समावेश या कलाकृतींव्दारे करण्यात आला आहे. अंजन कुमार, अर्पिता चंद्रा आणि सुमिता मैती यांनी स्त्रीरुपाला अनोखं कोंदण प्राप्त करून दिलं आहे. तर किंकर घोष आणि प्रदीप कुमार साऊ गुढ चित्रं हा विषय हाताळला आहे.
बिक्रम दास, पार्थ प्रोतीम गायेन, राकेश साधक, सुब्रता बिस्वास या शिल्पकारांनी ब्रॉँझ मधली लोककलेतील शैली साकार केली आहे. पारंपारीक कला प्रकारांना आधुनिकतेचा बाज चढवून सादर केलेल्या या कलाकृती मुंबईकर कला रसिकांना नक्कीच भुरळ पाडतील.