सिनेमाभर रंगणार ‘मिस्टर & मिसेस’ची जुगलबंदी
मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. वेगळे काहीतरी बघायला उत्सुक असणाऱ्या सिनेरसिकही या प्रयोगांना उचलून धरतात, हा ट्रेंड ओळखून पूर्ण सिनेमाभर दोनच कलावंत असलेला एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतो आहे, या चित्रपटाचे नाव आहे ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’.

या चित्रपटाची पहिली झलक अर्थात प्रोमो सोमवारी एका पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश अनंत, चित्रपटातील कलावंत स्मिता गोंदकर, राजेंद्र शिसतकर, संगीतकार श्रीहरी वझे, छायाचित्रदिग्दर्शक सचिन गडांकुश, निर्माते मितांग भूपेंद्र रावल यांच्यासह चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी विजय पाटकर उपस्थित होते. हा चित्रपट २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
कथा : कॉर्पोरेट विश्वात रमलेल्या आणि मोठी स्वप्न असणाऱ्या जोडप्याची ही कथा… आयुष्य भौतिकार्थी सुंदर बनत गेले आणि त्यातून माणसे वजा होत गेली. अशाच एका दुहेरी कुटुंबाची कथा ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात पाहता येणार आहे. खऱ्या अर्थी वॉन्टेड सुखाकडे दुर्लक्ष करून अनवॉन्टेड सुखाच्या शोधात भटकणाऱ्या जोडप्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आजच्या जगातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर हा चित्रपट भाष्य करतो.
‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटातून उर्वी एंटरप्रायजेस मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. मितांग भूपेंद्र रावल यांनी ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटाच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे. यानंतरही अशा वेगळ्या आणि समाजात बदल घडवून आणतील अशा विषयांवर चित्रपट निर्माण करण्याचे आश्वासन ते देतात.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश अनंत यांनी केले आहे. हा त्यांचा दिग्दर्शनातला पहिला चित्रपट असला तरी यापूर्वी बऱ्याच चित्रपटांसाठी त्यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे, त्यात प्रामुख्याने ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘श्वास’ या चित्रपटांचा समावेश आहे. दिग्दर्शनाबरोबरच पटकथाही दिनेश अनंत यांनी लिहिली आहे.
‘क्राईम पेट्रोल’ या हिंदी मालिकेतून इन्स्पेक्टर साकारणारे राजेंद्र शिसतकर ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात मिस्टर अनवॉन्टेडच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात आपल्या इन्स्पेक्टरी शेल्यातून बाहेर पडत राजेंद्र शिसतकर एका बँक मॅनेजरची भूमिका साकारत आहेत.
‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे स्मिता गोंदकर… सध्या तिची कांताबाईची सेल्फीही तितकीच गाजते आहे. आता ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती एका इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसणार आहे.
संगीत श्रीहरी वझे यांचे असून सुरेश वाडकर यांच्या आवाजातील एकमेव गाणे या चित्रपटात आहे. छायाचित्रदिग्दर्शन सचिन गडांकुश यांचे आहे. कथा प्रकाश गावडे यांची असून, पटकथा लेखन प्रकाश गावडे आणि दिनेश अनंत यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता प्रमोद मोहिते आहेत.
वेगवेगळ्या महोत्सवात गौरव
वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटाला पाच नॉमिनेशन मिळाले असून, त्यापैकी ३ पुरस्कारांनी या चित्रपटाचा गौरव झाला आहे.