नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत सहयोग
अवयवदानासाठीच्या कार्यामध्ये सहभागी होत आणि अवयावादानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (एनएसएसएच) आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आणि स्वतः अवयवदानाचा निश्चय केलेली रवीना टंडन या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अवयवदान कार्यक्रमाची ब्रँड अॅम्बॅसेडर बनली आहे.

अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याची गरज अधोरेखित करत, एनएसएसएचचे सीओओ डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितले, ‘अवयवदान हे सर्वात महान कार्य आहे. देशात या बाबतीत मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत असल्याने, लोकांनी या कार्यासाठी पुढे येण्याची मोठी गरज आहे. विविध घटकांच्या प्रयत्नांमार्फत अवयवदान जागृती कार्यक्रमाला चालना देणे, ही काळाची गरज आहे. अवयवदान जागृतीचे प्रमाण वाढवण्यासाठी, एनएसएसएच आरोग्य सुविधा देण्याच्या सर्वोत्तम पद्धती वापरून आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक नैतिक तत्त्वांचे पालन करून सक्रिय कार्यरत आहे.’
‘अवयवदान उपक्रमांबाबतची मोहीम शहरांपुरती मर्यादित राहू नये. या मोहिमेचा प्रसार लहान शहरांमध्येही होण्याची गरज आहे. नानावटीने अवयवदानासंबंधी मोठी मोहीम अवलंबून यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू केले आहेत आणि नानावटीच्या या उदाहरणाचे अनुकरण, पायाभूत सुविधा व निधी असलेल्या अन्य मोठ्या रुग्णालयांनीही करावे. अवयवदानाची मोहीम लहान शहरे व गावांपर्यंत पोहोचली नसल्याचे एक कारण म्हणजे, अशा उपक्रमांविषयीच्या माहितीचा अभाव. माहितीची कमतरता भरून काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत आणि अवयवदानाबाबतचे प्रश्न, शंका दूर करण्यासाठीही तरतूद करायला हवी,’ असे रवीना टंडन हिने नमूद केले.

“अमेरिकेत दररोज अंदाजे ७९ लोकांना अवयवदानाचा लाभ मिळतो. भारतातील स्थिती गंभीर होत असून, भारतातील अंदाजे १० लाख लोकांना अवयव निकामी होण्याचा शेवटच्या टप्प्यातील त्रास होत आहे; दरवर्षी जेमतेम ३५०० ट्रान्सप्लांट केले जातात. अवयव मिळण्यास विलंब झाल्याने, भारतात दररोज अंदाजे ५० जणांचा मृत्यू होतो. अवयवदानाविषयी जागृती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत आणि अवयवदान करण्याचे महत्त्व सांगून लोकांना संवेदनशील बनवण्यासाठी एनएसएसएच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे एनएसएसएचचे प्रोफेशनल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. दीपक पाटकर यांनी सांगितले.
अवयवांना असलेली मागणी त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असून, देशात अवयवदानाची प्रचंड चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. अंदाजे ५ दशलक्ष भारतीयांना अंतिम टप्प्यातील रेनल आजार आहेत आणि प्रतीक्षा यादीतील केवळ २% रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण केले जाते. रुग्णांना नवे जीवन देण्यासाठी लाइव्ह रेनल रिप्लेसमेंट उपचार हा उत्तम पर्याय ठरत आहे. एचएलए मॅचिंग आणि इम्युनोसप्रेशन अशा प्रक्रियांमुळे किडीनी डोनर शोधण्याची पद्धत सुलभ झाली आहे.

‘मुंबईतील आतापर्यंतचे बहुतांश हार्ट ट्रान्सप्लांट पुणे, इंदूर, सांगली व सातारा अशा टिअर-२ शहरांतील दात्यांनी केलेल्या दानानुसार झाले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या महानगरांतील लोक अवयवदानासाठी फार उत्साही नाहीत, ही खेदाची बाब आहे. केवळ अवयवदानच नाही, तर त्याविषयी जागृती करणे हाही कोणत्याही अवयवदान उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असायला हवा. आपण सर्वांनी अवयवदान करायचे ठरवले तर दुर्दैवी आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. अवयवदान केल्याबद्दल, जिवंत व्यक्ती मयत रुग्णाच्या नातेवाईकांचे आभार मानतील आणि जीवनाचे चक्र असेच पुढे सुरू राहील. लोकांनी अयवदान करण्यासाठी पुढे यावे. यामुळे विविध आजारांचे प्रमाण लक्षणीय कमी होऊ शकते,’ असे डॉ. हेमंत पाठारे, लंग ट्रान्सप्लांट व व्हीएडी सर्जन, यांनी सांगितले.
यानिमित्त, भावनिक त्रास सहन करत, आपल्या प्रियजनांचे अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतलेल्या कुटुंबांना रवीन टंडनच्या हस्ते गौरवण्यात आले.