सिनेरसिकांना १६ सप्टेंबरची प्रतीक्षा

आयुष्यात रंग भरण्यासाठी आणि मूड फ्रेश करण्यासाठी कॉलेज कट्टा एकमेव पर्याय आहे. मैत्री, प्रेम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह कॉलेजमध्येच पाहायला मिळतो! या कट्ट्यावर होणाऱ्या गप्पा-टप्पा, मौज- मस्ती पुन्हा एकदा अनुभवण्याची नामी संधी आगामी ‘फोटोकॉपी’ या सिनेमातून मिळणार आहे.
व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच फेमस स्टुडियोत युथफूल ट्रेलर लॉँच करण्यात आला. कॉलेज जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करणारा ठरत आहे. मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, पुण्यातील लवासा येथील निसर्गरम्य परिसरात झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे मन प्रसन्न करून टाकणारे दृश्यदेखील यात दिसून येतात. शिवाय चेतन चिटणीस आणि पर्ण पेठे या फ्रेश जोडींचा रोमान्स ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तसेच जुळ्या बहिणीची गम्मत यात दिसत असून, एक हटके लव्ह ट्रॅन्गल यात पाहायला मिळते.

जग कितीही मॉडर्न झाले तरी ‘प्रेम’ ही कधीच न बदलणारी संकल्पना आहे, ‘फोटोकॉपी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हेच पाहायला मिळते. कॉलेजविश्वात रमणाऱ्या तरुणांईंना या सिनेमाचा ट्रेलर लुभावणारा ठरत आहे. ‘फोटोकॉपी’ सिनेमाचा हा फ्रेश ट्रेलर पाहताचक्षणी मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.
या चित्रपटाबद्दल सांगताना हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे पर्ण सांगते. यात माझी दुहेरी भूमिका असून, माझ्यातल्या दोघी पडद्यावर साकारण्याचा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला असल्याचे तिने सांगितले. शिवाय चेतन चिटणीस हा नवोदित अभिनेता फोटोकॉपी मधून डेब्यू करत असल्यामुळे तो देखील आपल्या या पहिल्या फिल्मसाठी खूप उत्साही असल्याचे सांगतो.
कॉलेज तरुणांचे भावविश्व टिपणारा हा सिनेमा विजय मौर्य यांनी दिग्दर्शित केला असून, योगेश जोशी सोबत त्यांनी सिनेमाची पटकथा आणि संवाददेखील लिहिले आहेत. जाहिरात क्षेत्रात अग्रगण्य असलेले विजय मौर्य ‘फोटोकॉपी’ मार्फत प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.

या सिनेमाबाबत सांगताना विजय मौर्य यांनी ‘या चित्रपटाची कथा तशी गंमतीची आणि मजेशीर असल्याचे सांगितले. ‘तसेच सिनेमाच्या ‘फोटोकॉपी’ या नावाचा अर्थदेखील त्यांनी स्पष्ट केला. यांजबरोबर निर्माती नेहा राजपाल यांनी आपल्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शकाची मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल मी त्यांचे आभार मनात असल्याचे विजय मौर्य यांनी सांगितले.

प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या गायिका नेहानेदेखील या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा असल्याचे सांगतात. पर्ण आणि चेतन या फ्रेशजोडीसोबतच वंदना गुप्ते यांचीदेखील विशेष भूमिका ‘फोटोकॉपी’मध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमात मी एका आधुनिक विचाराच्या आज्जीची भूमिका करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाय ‘शाळा’ फेम अंशुमन जोशी देखील ‘फोटोकॉपी’मधून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.