आनंद शिंदेंच्या आवाजाचा स्वरसाज
‘सेव्हन हॉर्स एंटरटेन्मेंट’च्या बेनरखाली तयार होणाऱ्या ‘ऍडल्टस ओन्ली’ या आगामी मराठी चित्रपटात रसिकांना पुन्हा एकदा आनंद शिंदे यांचा निराळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
एका वेगळयाच धाटणीच्या आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या आनंद शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच आगळया वेगळया गाण्यांची भेट दिली आहे. आता पुन्हा एकदा त्यांचं ‘आपला हात जगन्नाथ…’ गाणं रसिकांच्या पसंतीला उतरत आहे.

‘तानी’ आणि ‘फुंतरू’सारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती करणारे अजय ठाकूर ‘ऍडल्टस ओन्ली’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोडयुसर असून ‘सेव्हन हॉर्स एंटरटेन्मेंट’चे सीईओ राज यादव ‘ऍडल्टस ओन्ली’ या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहेत. ‘ऍडल्टस ओन्ली’ हा चित्रपट सुरूवातीपासून चर्चेचा विषय ठरला आहे.
‘आयफोन 6’वर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येत असल्याने या चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी कधीही झालेला नाही. या नावीन्यपूर्ण प्रयोगाला आता आनंद शिंदेंच्या दणकेबाज वाजातील ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्याची साथ लाभली आहे.

मिलिंद कवडे यांच्या ‘शिनमा’ या चित्रपटातील “तुझी चिमणी उडाली…’’ हे गाणं महाराष्ट्रातील मायबाप रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं, आता ‘ऍडल्टस ओन्ली’मधील ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोयं.
