नवी मुंबईतील नाझनीनची मराठी सिनेमात दमदार एंट्री!
चार शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘यारी दोस्ती’मध्ये एक ‘परी’ दिसणार असून, ही हटके भूमिका नवी मुंबईतील ओरिएंटल कॉलेजमध्ये बीएससी आयटीच्या थर्ड इयरला असणाऱ्या नाझनीन कुरेशीने साकारली आहे. या चित्रपटाद्वारे नाझनीन मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री करते आहे.

या चित्रपटात बहुतेक नवीन चेहरे असून, प्रत्येकाने ऑडिशन दिली होती. त्यानंतर दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळ्या कलावंतांवर मेहनत घेऊन त्यांना तयार केले. इतर कलावंतांप्रमाणेच नाझनीन ऑडिशनसाठी गेली आणि अमराठी असली तरी तिच्यातील अभिनयाच्या सामर्थ्याने आणि मराठीतही छान संवाद साधण्याचे कसब असल्याने ती टीम ‘यारी दोस्ती’त समाविष्ट झाली.
शूटिंगचा अनुभव कसा होता, असे ‘रंगमैत्र’ने तिला विचारले असता नाझनीन म्हणाली, ‘ऑडिशन अवघड होती मात्र प्रत्यक्ष शूटिंग करताना हसत खेळत छान भट्टी जमली. शूटिंगमध्ये कुठलाही ताण नव्हता.’
शांतनू अनंत तांबे लिखित आणि दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ सिनेमा किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे.
पॅशनवल्ड एंटरटेनमेंटस्ची निर्मिती असलेल्या या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. नाझनीनसह आशिष गाडे, सुमित भोकसे हे कलाकार पदार्पणास सज्ज आहे. यांच्यासोबतच या सिनेमात संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग, मनीष शिंदे आणि मनीषा केळकर यांच्यादेखील ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत. हा सिनेमा १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.