जगभरातील संगीत कलाकार होणार सहभागी
३ फेब्रुवारी २०१५ ही उस्ताद अल्लारखॉं यांची पंधरावी पुण्यतिथी आहे. पुन्हा एकदा या निमित्ताने संपूर्ण भारतातून आणि जगभरातून कलाकार षण्मुखानंद हॉलमध्ये या गुरु आणि तबलानवाजाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येत आहेत.
अब्बाजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या ‘होमेज टू अब्बाजी’ला शास्रीय संगीत विश्वामध्ये एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. गेल्या पंधरा वर्षात तो जगातील एक महत्वाचा लोकप्रिय तंतुवाद्य सोहळा म्हणून नावारूपाला आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता या सोहळ्याला ‘ताल प्रणाम’ने सुरूवात होणार असून गुरुजींचे शिष्य त्यांना या सत्रामध्ये आदरांजली अर्पण करणार आहेत. त्याचबरोबर नुकतेच आकस्मिक निधन पावलेले मेन्डोलीन वादक यु श्रीनिवास यांना उस्ताद झाकीर हुसेन, शंकर महादेवन, हरिहरन, रणजीत बारोट, यु राजेश, शिवमणी, गणेश राजगोपालन, श्रीधर पार्थसारथी, निलाद्री कुमार, साबीर खान आणि राकेश चौरसिया हे प्रख्यात कलाकार श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. दुपारी सादर होणा-या ताल तपस्याची सुरूवात ११.३० वाजता श्री श्रीधर पार्थसारथी यांच्या मृदंगम एकल वादनाने होणार आहे त्यानंतर प्रख्यात कथक नर्तिका दिवंगत सितारा देवी यांना विशेष आदरांजली अर्पण केली जाणार आहे. या सत्राचे संयोजन त्यांचे पुत्र रणजीत बारोट हे करणार आहेत. पंजाब घराण्याची महती सांगणारी अदाकारी आणि व्याख्यानांचे आयोजनही यावेळी केले गेले आहे. पंजाबचे रहिवाशी असलेले तबलावादक श्री सुशीलकुमार हे या सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत.संध्याकाळच्या सत्राची सुरूवात सायंकाळी ६:३० वाजता इंडो-सेलिक ग्रुपच्या अदाकारीने होणार आहे. या सोहळ्याची भव्य अंतिम सांगता झाकीर हुसेन यांच्या सत्राने होणार आहे. त्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होत आहेत.
‘गेल्या १५ वर्षामध्ये भारतातील काही श्रेष्ठ कलाकारांचा सहभाग या सोहळ्यात लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून जगभरातील संगीताच्या अनेकविध परंपराच या व्यासपीठावर सादर होताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.” असे उदगार झाकीर हुसेन यांनी काढले. ते म्हणाले कि ३ फेब्रुवारी २०१५ चे आयोजनही त्याला अपवाद असणार नाही. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सत्राच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रमाच्या एक तास अगोदर षण्मुखानंद सभागृहात मिळतील.