बोरिवलीतील पुष्पांजली गार्डन्समध्ये रंगला सोहळा
फाल्गुनी पाठक यांच्या ११ दिवसीय नवरात्री उत्सवाचे ११ सप्टेंबरला बोरीवलीतील पुष्पांजली गार्डन्स येथे भूमिपूजन समारंभ पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, महिला व बाल विकास मंत्री विद्या ठाकूर आणि दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी आणि स्वतः दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की ‘मुंबई महापालिका निवडणूक २०१७ ला समोर ठेवून आम्ही आगामी सण उत्तम प्रकारे साजरे करणार आहोत. सांप्रादायीक सलोख्याच्या वातावरणात उत्सव आनंदात साजरा केला जातो, हा संदेश यातून मिळणार आहे. नवरात्रौत्सव भारतातील अनेक भागांमध्ये एक अग्रगण्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि वैभवात साजरा केला जातो, हे विशेष आहे.’
श्रीया एव्हेंट्स एलएलपीचे भागीदार, संतोष सिंह म्हणाले ‘आमच्या नवरात्री उत्सवाच्या भूमिपूजन समारंभात प्रमुख राजकीय व्यक्ती उपस्थित राहिले हा आम्ही आमचा सन्मान समजतो. पुष्पांजली गार्डन्स, बोरीवलीच्या या मोठ्या पटांगणावर फाल्गुनी पाठकसोबत महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्रौत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, त्याची ही पुष्टी आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय नवरात्री गायिका फाल्गुनी पाठक, त्यांच्या ता थैया या ग्रूपसोबत, सर्वोत्तम लोकगीते आणि बॉलिवूड ट्यून्सची मेजवानी देऊन उत्सव प्रेमींना मंत्रमुग्ध करणार आहेत.’