पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्ममेकर रवी जाधव गेली सहा वर्ष मराठी सिनेसृष्टी गाजवल्यावर आता हिंदी सिनेसृष्टीत आलाय. इरॉस इंटरनॅशनल निर्मित आणि रितेश देशमुख-नर्गिस फाखरी स्टार कास्ट असलेला त्याचा ‘बँजो’ सिनेमा २३ सप्टेंबरला रिलीज होतोय. त्यानिमीत्ताने रवी जाधवशी साधलेला हा ‘प्रोमोशनल’ संवाद…

रवी जाधवला सोलापुरात गावला ‘बँजो’
बहुप्रतीक्षित हिंदी सिनेमा येतोय २३ सप्टेंबरला
‘बँजो’ कुठे सापडला?
मी ‘नटरंग’च्या प्रमोशनसाठी सोलापुरात गेलो होतो आणि तेव्हा एका लग्नाच्या वरातीत बँजोवादकांना पाहिलं. वरातीत व-हाडी पैसे उधळत होते आणि ते पैसे वादकमंडळी गोळा करत होती. त्या दृश्याने मी एकदम स्तब्ध झालो. मन विषण्ण झालं. हे दृश्य नंतर काही काळ मनात घर करून राहिलं. आणि मग ही कथा कागदावर उतरली.
या सिनेमासाठी तुम्ही जवळ-जवळ दोन वर्ष संशोधन केलं असं ऐकलं. हे खरं आहे का?
हो. मी देशभरातल्या जवळ-जवळ ५० बँजो ग्रुपशी तरी बोललो असेन. बँजो हे वाद्य आपण लग्नाच्या वरातीत किंवा गणपतीच्या वरातीत वाजवताना अनेकदा पहिलं आहे, पण बँजो फक्त महाराष्ट्रातच वाजवलं जातं नाही, तर हे वाद्य पंजाब, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्येही वाजवलं जातं. हे वाद्य हैदराबादमध्ये ही लोकप्रिय आहे. लखनौमध्ये हे कव्वालीच्या सामन्यांवेळी ही वाजवलं जातं. लोकमान्यता, आणि लोकप्रियता असली तरीही आज डीजेच्या जमान्यात ही मंडळी रस्त्यावर गाणी बजावणी करणारी मंडळी म्हणूनच राहिलीयत. जेवढ्या बँजो ग्रुपशी बोललो. तेवढ्या कथा आणि व्यथा उलगडल्या. ज्यांचा एक कोलाज या सिनेमात तुम्हांला कथेच्या स्वरूपात पाहायला मिळेल.
रितेशलाच ‘तराट’च्या भूमिकेसाठी निवडण्यामागे काय कारणं होतं?
रितेश देशमुख हिंदी सिनेमांमध्ये जास्त विनोदी भूमिकांमधूनच प्रसिध्द झालाय. तर मराठी सिनेसृष्टीत तो ‘लय भारी’मुळे एक्शन हिरो म्हणून लोकप्रिय आहे; पण बालक-पालक सिनेमामुळे जेव्हा मी रितेशच्या जास्त संपर्कात आलो. तेव्हा त्याची अभिनयाविषयी आणि सिनेमाविषयी समज मला खूप प्रभावित करून गेली. त्याचा ‘एक विलन’ सिनेमा पाहिल्यावर तर मी माझ्या निर्णयावर अधिक ठाम झालो. मराठी संस्कृतीत रूळलेला, बँजो-वादकांविषयी इत्थ्यंभूत माहिती असलेला तो बॉलीवूड स्टार आहे. त्यामूळे त्याच्याशिवाय दुसरा कोणी अभिनेता माझ्या डोक्यात आलाच नाही.
रितेशने यात केस वाढवले आहेत. त्याच्या लूकविषयी काही सांगा.
मी जेव्हा सिनेमासाठी बँजोवादकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ब-याचशा वादकांनी त्यांचे त्यांचे केस वाढवलेत. खोदून विचारणा केल्यावर लक्षात आलं की, तो ‘कुल’लूक त्यांच्या व्यवसायासाठी पूरक ठरतो. त्याचप्रमाणे हा बँजोवादक तराट थोडासा बिनधास्त स्वभावाचा आहे. त्यामूळे ह्या लूकमूळे तराटचं स्वभाववैशिष्ठ्य अधोरेखीत होऊ शकत होतं.
नर्गिस फाखरीलाच या भूमिकेसाठी निवडण्यामागे काय कारणं होतं?
नर्गिस या सिनेमामध्ये क्रिस्टीयाना नावाच्या मुलीच्या भूमिकेत आहे. ही भारतीय वंशाची मुलगी अमेरिकेतून भारतात येते. अशावेळी मला अमेरिकन उच्चारण शैली असलेली अभिनेत्री निवडणं गरजेचं होतं. तसंच नर्गिस भूमिकांची निवड करताना सिनेमाच्या कथानकाला वाव देते, हे मला आवडलं. ती मला म्हणाली, मला सिनेमात नुसता मेकअप करून छान दिसण्यावर भर द्यायला आवडतं नाही. आणि खरंच तिने भूमिका साकारताना केलेला प्रामाणिक प्रयत्न तुम्हांला आवडून जाईल.