रसिकांच्या कोर्टात ‘मडवॉक’ एकांकिका अव्वल!
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सवाई एकांकिका स्पर्धे’त पुण्याच्या आय.एम.सी.सी.ची ‘बॉर्न १’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. द्वितीय क्रमांक पटकावणा-या उल्हासनगरच्या सी. एच. एम. अक्षरच्या ‘मडवॉक’ने प्रेक्षकांची पसंती मिळवून ‘प्रेक्षक पारितोषिक’ही पटकावले.
रवींद्र नाटय़मंदिरात २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेली ‘सवाई’ स्पर्धा रात्रभर रंगली. तरुणाईचा उत्तुंग प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत औरंगाबादची ‘जागरण’, उल्हासनगरची ‘मडवॉक’, मुंबईच्या साठे महाविद्यालयाची ‘दस्तुरखुद्द’, पिंपरी-चिंचवडच्या नाटय़ परिषदेची ‘द कॉन्शन्स’, पुण्याची ‘बॉर्न १’, बदलापूरच्या अनुभुतीची ‘आयुष्य एक होताना’ आणि मुंबईच्या झेप कलामंचची ‘ई=एस.सी. स्क्वेर’ अशा सात एकांकिकांचे सादरीकरण झाले.
या स्पर्धेत’ बॉर्न १’ने सवाई लेखक (मानस लयाळ), सवाई दिग्दर्शक (अजिंक्य गोखले), सवाई ध्वनिसंयोजक (प्रतिक केळकर), सवाई प्रकाशयोजनाकार (सचिन शेकदार-अक्षय जोशी) आणि सवाई अभिनेत्री (नेहा साठेची भूमिका साकारणारी तन्वी कुलकर्णी) हे महत्त्वाचे सारे पुरस्कार पटकावून ‘सवाई’ करंडकावर आपले नाव कोरले. प्रेक्षकांच्या कोर्टात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या श्रीपाद देशपांडे लिखित आणि सुनील हरिश्चंद्र दिग्दर्शित ‘मडवॉक’च्या नेपथ्यासाठी सुयोग भोसले यांना तर बेंजामिन फ्रॅकलिनची भूमिका वठवणा-या अभिजित पवारला सवाई अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक मिलिंद फाटक, सीमा देशमुख, सुबोध भावे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री अदिती सारंगधर, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक अभिजित घोरपडे आदी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण २६ जानेवारीला सकाळी ६ वाजता करण्यात आले.
स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावणारी टीम ‘मडवॉक’. (छायाचित्र : संजय वैद्य)