पु.ल. अकादमीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी लेखक आसाराम लोमटे यांचा सत्कार आणि त्यांच्या कथांचे अभिवाचन असा कार्यक्रम गुरुवार १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मराठी सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सहभागी होत आहेत.
लोमटे यांना ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी या वर्षीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आलोक व इडा पीडा टळो या दोन कथासंग्रहातील काही कथांश व एका दीर्घकथेचे अभिवाचन ज्येष्ठ चित्रपट-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह निवेदिका व अभिनेत्री डॉ. उत्कर्षा बिर्जे व राजश्री पोतदार, अभिनेते समीर दळवी व श्रीनिवास नार्वेकर करणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे अकादमीकडून आवाहन करण्यात आले आहे.