अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचे २६ नोव्हेंबरला बक्षीस वितरण
उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून सिनेरसिक आणि कलावंतांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा तिसऱ्या वर्षीही उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यात २५ चित्रपट आणि ५० लघुपटांचा समावेश होता.

‘अंबर भरारी’ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि शहरातील इतर संस्थांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची सांगता आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी गावदेवी मैदान, अंबरनाथ (पूर्व) येथे केले जाणार आहे.
२१ सप्टेंबरला योगेश सोमण यांच्या ‘माझं भिरंभिरं’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात तर ३० ऑक्टोबर रोजी गिरीश मोहिते यांच्या ‘सर्वनाम’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. नातवंड, मुंबई किनारा, सॉरी, रायरंद, नॉट अ ब्रेकिंग न्यूज, हॅप्पी बर्थ डे टु यू, नरया, धुमा, खोपा, प्रतिभा, वाक्या, बाळ भीमराव, ब्रेव्हहार्ट, गणू, ट्रकर आदी चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले.
अंबर भरारी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, निखील चौधरी आदींनी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा अभिनय असलेला प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट ‘गडबड गोंधळ’ही या महोत्सवात दाखविण्यात आला. त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात विशेष स्मृती सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे तसेच सिने पत्रकार म्हणून यंदा दिलीप ठाकुर यांना सर्वोत्कृष्ट सिने पत्रकार पुरस्कार दिला जाणार आहे चित्रपट लेखक, दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी महोत्सवाचे दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली.
महोत्सव समितीतील जगदिश हडप, गिरीश पंडित, अभय शिंदे, अनिल कवठेकर, डॉ. राहुल चौधरी यांनी चित्रपटांचे परीक्षण केले.