आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट
चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ‘आम्ही दोघी’ या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेमध्ये एकत्र येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत, असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.
‘आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल व त्यांच्या संवेदनशिलतेला स्पर्श करून काही गोष्टीचा विचार करायला भाग पाडेल,” असे उद्गार दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.
मुक्ता बर्वे ही आजची मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची कलाकार आहे. तिने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिका आणि नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत व त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. ‘जोगवा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या भूमिकेसाठी तिचे कौतुक झाले. प्रिया बापट हिने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदीमध्येही अनेक महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ‘काकस्पर्श’ या चित्रपटाने तर तिला सर्वदूर प्रसिद्धी मिळवून दिली. प्रतिमा जोशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल १० चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पारी पाडली आहे. या चित्रपटांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘आम्ही दोघी’ या चित्रपटाची पटकथा आणि सवांद भाग्यश्री जाधव यांचे आहेत. चित्रपटसृष्टीला ज्ञात असलेल्या बहुआयामी प्रतिमा जोशी आता पहिल्यांदा दिग्दर्शिका म्हणून रसिकांसमोर येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची निर्मित-सादरीकरण असलेला आणि मुक्ता बर्वे व प्रिया बापट यांच्या हटके भूमिका असलेला ‘आम्ही दोघी’ म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.