महाराष्ट्राचा महागायक नव्या भूमिकेत
‘जेव्हा नवीन पोपट हा…’ या गाण्यापासून ते अगदी ‘गणपती आला आणि नाचत गेला’ या गाण्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारे, महागायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून येत आहेत. साई इंटरनेशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे ते दिग्दर्शन करणार आहेत.

आनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांची प्रमुख भूमिका यात असून, या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच ते अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत. आदर्श आणि उत्कर्ष या शिंदेबंधूंचे संगीतदेखील या सिनेमातील गाण्यांना लाभणार असल्याकारणामुळे, शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या ‘साई अॅग्रो टेक’ या संस्थेअंतर्गत उमेश जाधव, शंभू ओहाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ निर्मात्याची धुरा सांभाळणार असून, अनेक नामवंत कलाकरांची भूमिका यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली असून, सोलापूर, भोर, मुंबई चित्रनगरीत चित्रित होत असलेला हा सिनेमा महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.