अनंत डेरे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार तसेच रंगलेखनाचे व्याख्याते अनंत डेरे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन १७ जानेवारीपासून मुंबईत वरळी येथे असणाऱ्या नेहरू सेंटर कलादालनात सुरु झाले आहे. या प्रदर्शनातील चित्राकृतीतीही लक्षवेधी असून, हे प्रदर्शन २३ जानेवारीपर्यंत कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत निःशुल्क बघता येणार आहे.

अनंत डेरे यांच्या आकृतीप्रधान चित्ररचना निसर्गाच्या विविध रुपवैभवाची साक्ष देतात. वेगवेगळ्या चित्रांमध्ये रंग, आकृतिबंध आणि लयबद्धता विणली आहे. हे विणकाम करताना त्यात स्त्रीप्रतिमेचं नैसर्गिक सौंदर्य रेखाटून, त्यात गोष्टरूपी नाट्यमयता गुंफली आहे. त्या गोष्टीतील व्यक्तिरेखा साकारताना टोकाचा साधेपणा ठेवण्याचे भान रंगलेखकाने जपले आहे, हेच या चित्रांचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रामीण जीवनातील नैसर्गिक शृंगार यामुळे चित्रातही अबाधित राहिला आहे. ही सौंदर्यस्थळे नेमकेपणाने हेरली आहेत.
अनंत डेरे यांनी पुण्यातील अभिनव कलामहाविद्यालयातून ए.टी.डी हे कलाध्यापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच महाविद्यालयातून अप्लाइड आर्टमध्ये जी.डी. ही पदवी मिळवली. त्यानंतर औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डेरे यांनी एम.एफ.ए. ही मास्टर डिग्री कामवाली आहे. कलाध्यापनात व्यस्त राहून त्यांनी आपल्या वैयक्तिक रंगलेखनाची प्रक्रिया अविरत ठेवून आजवर अनेक लक्षणीय कलाकृतींद्वारे रसिकमने जिंकली आहेत. या प्रदर्शनातील कलाकृती त्यांना आणखी एका उंचीवर घेऊन जातील, हा विश्वास अधोरेखित करणाऱ्या आहेत.