अनुप सिंगचा अभिनयासह स्वरसाज
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतला स्टार अभिनेता ठाकूर अनुपसिंग आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतो आहे. अभिनेता मिलिंद गवळी दिग्दर्शित आगामी चित्रपटात अनुप सिंगनं ‘धिना धिन धाना’ गाणं गायलं असून, तो या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेले नसून लवकरच ते सांगण्यात येणार आहे.

हिंदीतले संगीतकार बबली हक यांनी ‘धिना धिन धाना’ हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. मिलिंद गवळी अभिनेता म्हणून सुपरिचित आहेतच. त्यांनी या पूर्वी ‘अथांग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अनुप सिंगनं आतापर्यंत ‘महाभारत’, ‘कहानी चंद्रकांता की’ अशा बऱ्याच हिंदी मालिका केल्या आहेत. मूळचा पायलट असलेल्या अनुप सिंगनं वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह मि. वर्ल्ड हा किताबही पटकावला होता. त्यानंतर त्यांनं दाक्षिणात्य चित्रपटांतून स्वत:ची छाप पाडली.
आगामी सिंघम ३, दाक्षिणात्य चित्रपटातीस मोठा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसेल. आता तो मराठी चित्रपटसृष्टीत दाखल होत आहे. ‘अनुप सिंग हे दाक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्ध आहेत. दमदार शरीर कमावलेला हा अभिनेता उत्तम गायकही आहे. त्यामुळे त्यानंच हे गाणं गाण्याची तयारी दर्शवली. हे गाणं अतिशय छान झालं आहे. चित्रपटाची स्टारकास्ट आणि तंत्रज्ञ हे नक्कीच तगडे असतील यात शंका नसून अॅक्शनपॅक्ड असा हा चित्रपट असेल,’ असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं