पंचम निशाद प्रस्तुत उद्योन्मुख कलाकारांचा महोत्सव
पंचम निशाद क्रिएटिव्ह्सचा ‘आरोही’ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील आश्वासक चेहऱ्यांना समोर आणणारा एक आगळावेगळा दोन दिवसीय महोत्सव १२ आणि १३ मे रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ६ वाजल्यापासून सादर होईल.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला टाटा कॅपिटल आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
यंदा १६ वे वर्ष साजरे करणाऱ्या ‘आरोही’ची सुरुवात झाली २००२ साली. ‘हिंदूस्थानी आणि कनार्टकी संगीतातील उद्योन्मुख कलाकारांचा महोत्सवात समावेश करण्याची आगळी संकल्पना यात राबवण्यात येते. भारतीय शास्त्रीय संगीतातील नव्या मात्र प्रसिद्धीच्या फारशा झोतात नसलेल्या प्रतिभावान आणि गुणी तरुण कलाकारांना रसिकांसमोर आणणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पंचम निषाद क्रिएटिव्हसचे संचालक शशी व्यास म्हणाले, ‘शास्त्रीय संगीताचा श्रोता निष्ठावान असतो. अर्थात, बहुतांश श्रोते दिग्गजांच्या मैफिलीला हजेरी लावणे पसंत करतात, हे काही आता गुपित राहिलेले नाही. मात्र, सध्याच्या ट्रेंडवरून ही परिस्थिती बदलत असल्याचे दिसते आहे. तरुण कलाकारांना ऐकण्यासही अनेक श्रोते उत्सुक असतात आणि म्हणूनच भारतीय संगीतातील या तरुण उद्योन्मुख ताऱ्यांना पंचम निषादकडून ‘आरोही’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ओघाने आलेच.’
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी केदार केळकर (गायन), वरदराजे भोसले (सितार) आणि भाग्यश्री देशपांडे (गायन) यांचा परफॉर्मन्स होईल.
केदार केळकर म्हणजे तरुण पिढीतील आवाजाची दैवी देणगी मिळालेला गायक. सुरुवातीच्या काळात अनुक्रमे नंदा गोखले, मेघनाथ कोल्हापुरे आणि रविंद्र गांगुर्डे यांच्याकडून रितसर गाण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता तो ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांच्या तालमीत आपल्या कलागुणांना पैलू पाडत आहे. त्याने आजवर तरुण कलाकारांसाठीच्या महाराष्ट्रातील अनेक महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या सखोल ज्ञानाला अर्थपूर्ण, सखोल आवाजाच्या निनादाची जोड मिळाली की हा आवाज रसिक श्रोत्यांच्या काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही. केदारला पुष्कर महाजन तबल्यावर आणि पेटीवर सौमित्र क्षीरसागर साथ करतील.
वरदराजे भोसले हा इमादखानी पद्धतीतील ख्यातनाम आणि ज्येष्ठ सितारवादक पंडित अरविंद पारिख यांचा गंडा बांधलेला शिष्य आहे. वरदराजे याची कौटुंबिक पार्श्वभूमीही संगीताचीच आहे. अगदी लहान असल्यापासूनच तो एक उद्योन्मुख गुणी सितारवादक म्हणून ओळखला जातो. लहान असल्यापासूनच त्याच्या वादनात सितारवादनातील तांत्रिक बहुविधतेसोबतच नाविन्यपूर्ण, काल्पनिकतेला वाव देणारा दृष्टिकोन दिसून येत होता. त्याला तबल्यावर भूषण परचुरे यांची साथ असेल.
भाग्यश्री देशपांडे – मेवाती घराण्याची गायकी गाणारी भाग्यश्री देशपांडे तिचे पालक पांडुरंग देशपांडे आणि राणी वडगावकर यांची शिष्या आहे. दमदार तरीही मंजुळ अशा आवाजाची दैवी देणगीच तिला लाभली आहे. शिवाय, शास्त्रीय संगीतासोबतच उपशास्त्रीय संगीतावरही तिची तितकीच मजबूत पकड आहे. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार आणि कर्नाटक सरकारच्या बालसरस्वती पुरस्कारासोबतच तिला इतरही अनेक पुरस्कार लाभले आहेत. आता भाग्यश्री संगीताच्या विश्वात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. तिला तबल्यावर मंदार पुराणिक आणि पेटीवर मंदार दीक्षित साथ करतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दीपिका भिडे भागवत (गायन), यज्ञेश रायकर (व्हायोलिन) आणि कौस्तुव कांती गांगुली (गायन) आपली कला सादर करतील.
दीपिका भिडे भागवत – संगीत क्षेत्रातील तरुण आश्वासक गायिका म्हणून ओळखली जाणारी दीपिका भिडे भागवत जयपूर-अत्रोली घराण्याची गायिका आहे. गाययोगिनी धोंडुताई कुलकर्णी, पं. मधुकरबुवा जोशी, शुभदा पराडकर, विनायकबुवा काळे आणि श्रुती गोखले यासारख्या अत्रोली घराण्यातील ख्यातनाम ज्येष्ठांकडून तिने प्रशिक्षण घेतले आहे. ख्यातनाम गायिका शोभा गुर्टू यांच्या ज्येष्ठ शिष्या गायिका शुभा जोशी यांच्याकडून ती सध्या उपशास्त्रीय गायिकेचे धडे घेत आहे. तिला तबल्यावर यती भागवत आणि पेटीवर सिद्धेश बिचोलकर साथ करतील.
यज्ञेश रायकर हा प्रसिद्ध व्हायोलिनवादक मिलिंद रायकर यांचा पुत्र आणि शिष्य आहे. यज्ञेश लहानपणापासूनच अप्रतिम कलाकार आहे. त्याने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून वडिलांसोबत प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. आता अतिशय तरल आणि सुरेल सुरावटींनी तो विविध मैफिलींमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो. त्याच्या रागाची समज इतकी सुंदर आणि प्रगल्भ आहे की दरवेळी संगीतरसिकांवर वेगवेगळ्या आणि नवनवीन सुरावटींचा आश्चर्यकारक वर्षाव होत असतो. संगीत विश्वात तो एक अधिकाराचे स्थान निर्माण करेल, असे मानले जाते. त्याला कालिनाथ मिश्रा यांच्या तबल्याची साथ असेल.
कौस्तुव कांती गांगुली हा हिंदुस्थानी संगीत परंपरेत पारंगत एक व्यावसायिक गायक, उद्योन्मुख म्युझिकोलॉजिस्ट आहेच. शिवाय, तो निष्णात इंजिनीअरही आहे. अवघा ४ वर्षांचा असताना त्याचे आजोबा दिवंगत फणिंद्र मोहन गांगुली यांनी त्याची संगीतविश्वाची पहिली ओळख करून दिली. त्याने सुरुवातीला श्रृतीनंदन येथे ख्यातनाम गायक अजय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर कोलकात्यात आयटीसी एसआरए येथे तो एक हुशार विद्यार्थी म्हणून शिकला. त्याने भारतात आणि परदेशात अनेक कार्यक्रमांमध्ये तरुण आश्वासक गायक म्हणून आपली कला सादर केली आहे. संगीतविश्वातील एक आश्वासक उद्योन्मुख गायक म्हणून त्याच्याकडे फार आशेने पाहिले जाते. सध्या कौस्तुव मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम्समध्ये (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग) पीएचडी करतो आहे. त्याला तबल्यावर स्वप्नील भिसे आणि पेटीवर सिद्धेश बिचोलकर यांची साथ असेल.
प्रवेशिका : २०० रु. आणि १०० रु.
प्रवेशिका www.bookmyshow.com येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : panchamnishadoffice@gmail.com / 7045597501.