चार कलावंतांच्या कलाकृतींचे १२ सप्टेंबरपासून प्रदर्शन
नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०१८ या ठिकाणी दि. १२ ते १८ सप्टेंबर २०१७ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील.
आर्किटेक्चर आणि टाऊन प्लानिंग मध्ये पदवित्तर शिक्षण घेतलेल्या चित्रकार पद्मनाभ बेंद्रे यांनी फिनिक्स ऍरिझोना, अमेरीका इथून डॉईंग आणि मोनोप्रिंटचं शिक्षण घेतलं. स्वयंसिद्ध कलाकार असलेल्या या चित्रकाराची देश विदेशात सोळा एकल आणि सहा समुह प्रदर्शनं मांडली गेली आहेत. न्यूऑर्क, हांगकॉंग, सान फ्रॅन्सिस्को, फिनिक्स, टोरंटो आणि दुबई अशा अनेक ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शनं भरली आहेत. चित्रकार पद्मनाभ बेंद्रे हे बेंद्रे फाउंडेशनचे ट्रस्टी असून त्यानी मुंबईत अनेक आर्टीस्ट कॅम्पचं आयोजन केलं आहे. त्यांची चित्रं देश विदेशातील आर्ट गॅलरी, आर्ट डीलर्स, आर्किटेक्ट आणि इंटेरीअर डिझायनर, कॉरपोरेट ऑफीसं आणि वैयक्तिक कला प्रेमींजवळ संग्रही ठेवण्यात आली आहेत. चौकोनांच्या सहाय्याने साकार केलेलं कोलाज हे त्यांच चित्रांचं खास वैशिष्ट्य आहे.
उपजत चित्रकार देवयानी पारीख गेली सहा दशकं कला साधना करीत असून १९७६ सालच्या बॉम्बे आर्टॅ सोसायटी जर्नल मध्ये चित्रकार रझा आणि बी.प्रभा यांच्या जोडीने त्यांची चित्रं प्रकाशीत झाली आहेत. सुमारे आठशे चित्रांमधून ही चित्रं निवडली गेली होती. वाळू, मातीची भांडी, संगीत रेकॉर्ड, वाळलेली पानं, लाकडी तंतुवाद्य अशा दैनंदिन वापरातील वस्तूंचा कलात्मक वापर त्यानी आपल्या कलाकृतींमधून केलेला दिसून येतो. बुद्ध आणि त्याच्या जीवनातील घटना, पंचशिल तत्व आणि ध्यानमग्नता, विपश्यना, वास्तव जीवन आणि निसर्ग असे अनेक विषय हाताळताना आजपर्यंत त्यानी १३ एकल आणि ४८ समुह प्रदर्शानात भाग घेतला आहे. अमेरीका, सयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, तुर्की अशा अनेक देशात त्यांच्या कलाकृतींना उदंड प्रतिसाद लाभला आहे. टर्की येथील “आंतरराष्ट्रीय कार्यशाळे”साठी त्यांना प्रायोजकत्व लाभलं होतं.
एच आर कॉलेज मधून वाणिज्य शाखेतील पदवी घेतलेल्या पुनम अगरवाल या उपजत कलाकार असून त्यानी आपल्याअंगी असलेल्या कलागुणांना साधनेची जोड देऊन नैपुण्य मिळवलं आहे. स्वत:ची अशी वेगळी शैली निर्माण करून ती रसिकांच्या पसंतीस उतरवण्याचं कठीण काम त्याना साध्य झालं आहे. स्वत:च्या कलेमधील होणारं परिवर्तन आणि आत्म्याची उत्क्रांत अवस्था अनुभवत असताना त्यानी निसर्गाला आपल्या कलाकृतींमध्ये नेहमीच महत्वाचं स्थान दिलं आहे. आजपर्यंत देश विदेशात ४० समुह आणि ७ एकल प्रदर्शनात त्यानी आपली कला रसिकांसमोर सादर केली आहे.
पुण्यात जन्मलेली कलाकार सुमना नाथ डे यांनी आपले वडील आणि गुरू स्वर्गीय सचिन नाथ यांच्याकडे कलेचे धडे गिरवले. जी.डी आर्ट मध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली ही चित्रकर्ती गेली वीस वर्ष चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत असून ११ एकल आणि २३ समुह चित्रप्रदर्शनात त्यानी आपली कला रसिकांसमोर पेश केली आहे. १९९८ चं उषा देशमुख सुवर्ण पदक (सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स) , कॅमलिन (रोख पारितोषिक आणि कला उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र), महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ आर्ट ऑनर सर्टीफिकेट, सर्वोत्कृष्ट पोर्ट्रेट पुरस्कार (नाशिक कला निकेतन), ललित कला अकादमी प्रादेशिक केंद्र प्रमाणपत्र; चेन्नई असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. लाकडावरील शिल्पकृती सादर करताना “बेटी बचावो….!” हा संदेश देण्याचाही त्यांचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. आपल्या कलाकार वडिलांना श्रद्धांजली म्हणून त्यानी सदर प्रदर्शनात आपल्या कलाकृती मांडल्या आहेत.
मुंबईस्थित चार सुप्रसिद्ध कलाकार पद्मनाभ बेंद्रे, देवयानी पारीख, पुनम अगरवाल आणि सुमना नाथ डे यांचं ‘डायव्हर्स एक्स्प्रेशन्स’ हे चित्र आणि शिल्पकृतींचं प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर एसी आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात येणार आहे.

एक्रिलिक आणि तैल रंगातील कॅनव्हासवरची अकर्षक चित्रं आणि लाकडातल्या शिल्पकृती यांचं अनोखं दर्शन या प्रदर्शनात होणार असून रचना, कौशल्य, तंत्र आणि शैली यांना नवकल्पनेची जोड देऊन साकार केलेल्या या कलाकृती कलारसिकांच्या प्रशंसनेस पात्र ठरतील.



