चित्रकर्ती संध्या मन्ने यांचे चित्र प्रदर्शन सुरू
प्रसिद्ध चित्रकर्ती संध्या मन्ने यांचे ‘ब्लॉसम्स इन ब्लूम : ए फ्लोरल फँटसी’ हे चित्र प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे १२ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संध्या या प्रामुख्याने तैल रंगात काम करतात. त्या भारतातल्या पहिल्या झेनटांगल प्रशिक्षका आहेत. भारत, अमेरिका, तैवान अशा देशविदेशात संध्या यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संध्या मन्ने यांनी देश विदेशात प्रवास केला आहे. त्यांच्या प्रवासासातील अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीमध्ये रसिकांना पाहायला मिळते.
तैलरंग आणि इंक या दोन अतिशय वेगळ्या माध्यमांचा वापर संध्या यांनी आपल्या चित्रांमध्ये उत्कृष्टपणे केला आहे. संध्या या प्रामुख्याने तैलरंग आणि इंक माध्यमात काम करतात. त्यांच्या ‘ब्लॉसमस इन ब्लूम’ या प्रस्तुत चित्र प्रदर्शनात त्यांची फुल आणि बहर या विषयाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या चित्रकृती रसिकांना पाहता येतील. फुलांचे अंगभूत अद्भुत सौंदर्य हा या चित्रमालिकेचा मध्यवर्ती विषय आहे. फुलांचे बहरणे आपल्याला निसर्गाच्या विलक्षण अशा सृष्टीचक्राची वारंवार आठवण करून देते. फुलांचं सौन्दर्य अधिक नेटकेपणाने मांडण्यासाठी संध्या या तैलरंगांचा वापर करतात.
तैलरंगांच्या विशिष्ट पोत फुलांचं सौन्दर्य कॅनव्हासवर अधिक चांगल्या प्रकारे खुलवतात आणि कलाकृतींना वास्तववादी कलाकृतीचा प्रत्यय येतो. पोत आणि तेजस्वी रंगांचा मोहक वापर हे संध्या यांच्या चित्रांचे वैशिष्टय आहे. प्रस्तुत प्रदर्शनात संध्या कॅनव्हासवर फुलांच्या आकारांचा वापर हा सौन्दर्य आणि मनःशांतीच प्रतीक म्हणून करतात. झेंटांगलं कोलाज या चित्र प्रकारचा उद्देशही मनशांती हा आहे. त्यामुळे संध्या यांची चित्र पाहिल्यावर रसिकांना सुखद निसर्ग चित्रण आणि मनशांतीचा अनुभव मिळतो. रंगांचे अदभूत छायानाट्य कला रसिकांना संध्या यांच्या चित्रात पाहायला मिळते. फुलं, फुलांचं अद्भुत सौन्दर्य, रंग बहर अशा नेत्रसुखद घटकांचा सोहळा पाहण्यासाठी रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.
प्रस्तुत प्रदर्शन हे रसिकांसाठी दि १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असेल.