प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचे ३० जानेवारीपासून प्रदर्शन
कर्जत येथील प्रसिद्ध चित्रकार प्रदीप घाडगे यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन ३० जानेवारीपासून मुंबईतील जगप्रसिद्ध जहांगीर कलादालनात सुरु आहे. ‘अस्तित्व’ या शीर्षकांतर्गत सुरु होणारे हे प्रदर्शन ६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांना ते निःशुल्क बघता येईल.
या प्रदर्शनात प्रदीप यांनी ग्रामीण भागातील दैनंदिन संवाद, जीवनशैली आणि संस्कृतीचे संवेदनशील चित्रण मांडले आहे. ऍक्रेलिकमधील ही चित्रे वास्तववादी असल्याने चित्ररसिकांशी थेट संवाद साधणारे आहेत. ग्रामीण जीवनशैली ही निसर्गाच्या देखणेपणासोबतच माणसांच्या शुद्ध अंतःकरणाने पावित्र्य धारण करून आहे, त्यांच्यातील जागरूकता त्यांचे अस्तित्व सिद्ध करणारी आहे. एकमेकांच्या आनंदात त्यांचे समाधानही सामावलेले असते, हीच ग्रामीण जीवनातील बलस्थाने रंगलेखकाने कॅनव्हासवर जिवंत केली आहेत.
रंगलेखकाच्या अवतीभवतीचे लोक, त्यातील निर्मळ वातावरण अचूकपणे टिपले आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधील आकर्षक वेशभूषा हे ग्रामीण जनजीवनाचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे, ते चित्रात नेमकेपणाने टिपण्याची किमया प्रदीप यांनी ताकदीने साधली आहे. या प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक कलाकृतीतील अनुभव अद्वितीय आहे.
खोपोलीच्या चित्रकला महाविद्यालयातून एटीडी ही कलाध्यापनाचे शिक्षण घेतलेल्या प्रदीप यांनी आजवर अनेक एकल प्रदर्शनाद्वारे आपल्या कलाकृती चित्ररसिकांपुढे ठेवल्या आहेत. त्या प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या रंगलेखनाचा अनेक प्रतिष्ठित पुरासकरांनी गौरव झाला असून, देशविदेशातील अनेक चित्ररसिकांच्या संग्रहात त्यांची चित्रे संग्रहित झाली आहेत.