एकता कपूरची नवी वेबसीरीज
अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णी आपल्या चाहत्यांना आता एका नव्या भूमिकेतून सुखद आश्चर्याचा धक्का देणार आहेत. एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या नव्या वेबसीरिजमध्ये त्यांची ही भूमिका पाहायला मिळणार आहे,
ऑल्ट बालाजीच्या नागेश कुकुनुर दिग्दर्शित वेबसीरिजमध्ये अतुल कुलकर्णी ब्रिगेडियर साठ्ये ह्या भूमिकेत दिसतील.
एकता कपूरच्या या नव्या वेबसीरिजमधील अतुल कुलकर्णीच्या भूमिकेचा तपशील जरी अद्याप उलगडला नसला तरीही, अतुलची यातील भूमिका स्पेशल फोर्सच्या अधिका-याची असल्याचं म्हटलं जातंय. सैनिकांना खास प्रशिक्षण देणा-या सैन्यातल्या अधिका-याच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी दिसेल.
अतुल कुलकर्णी म्हणतात, “एक अभिनेता म्हणून मी माझ्या करीयरमध्ये, नेहमीच आव्हानात्मक भूमिका आणि कथांची निवड करत आलोय. जेव्हा मला नागेशने ही भूमिका ऑफर केली तेव्हा मी ती साकारण्यासाठी खूप उत्सुक होतो. कारण अनेक प्रेक्षकांना अश्या भूमिका खूप आवडतात आणि या एका वेगळ्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. नागेशसोबत या प्रोजेक्टमध्य़े काम करणं एक चांगला अनुभव आहे.”
या वेबसीरिजचं अजून नाव ठरायचं आहे. नागेश कुकनुर दिग्दर्शित ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर पाहता येईल.