भारत सिंग यांच्या कलाकृतींचे १८ जानेवारीपासून प्रदर्शन
प्रसिद्ध व्यक्तींचे पोट्रेट रेखाटण्यासाठी ओळखले जाणारे समकालीन चित्रकार भारत सिंग यांनी डॉ. हरिवंशरॉय बच्चन यांची स्मृतीचित्रं साकारली असून, १८ जानेवारीपासून (बच्चन यांचा स्मृतीदिन) या कलाकृतींच्या प्रदर्शनाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.


लहानपणासून कलाकार होण्याचे स्वप्न पाहणारे भारत सिंग नेपाळवरून मुंबईत आले. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांबद्दल भारत यांना प्रचंड आदर आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील पहिले पोट्रेटचे चित्रप्रदर्शन भरवले. व्यंगचित्रकार बाळासाहेब आणि त्यानंतरचे राजकारणी बाळासाहेब त्यांनी चित्रातून साकारले. या पहिल्याच प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि भारत यांनी त्यांनंतर मागे वळून पाहिले नाही. ते प्रसिद्धीझोतात असणाऱ्या महान व्यक्तींचे चित्र काढत गेले. त्याला प्रतिसाद मिळत गेला आणि भारत सिंग यांचे कलावंत म्हणून ओळख मिळवण्याचे स्वप्न साकार होत गेले.
भारत सिंग अनेक कलावंताचे पोट्रेट साकारण्यासाठी त्यांच्या प्रेमात पडले. बच्चन कुटुंबीयांबद्दलही त्यांना अपार श्रद्धा आहे. हरिवंशरॉय बच्चन यांच्या ‘मधुशाले’च्या प्रेमात पडलेल्या भारत सिंग यांनी त्यांची चित्रे कशी रेखाटलीत हे कलादालनात जाऊन अनुभूती घेण्याचा विषय आहे. त्यासाठी कलारसिकांनी १८ ते २२ जानेवारीदरम्यान नरिमनपॉईंट येथील कमलनयन बजाज कलादालनाचा उंबरठा ओलांडलाच पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांवर त्यांचे प्रेम आहेच, ते प्रेम पोट्रेटमध्ये कसं झिरपलं, हे या प्रदर्शनातील चित्रांचं खास वैशिष्ट्य आहे.