एका गाण्यात कलावंत हजार!
हिंदी चित्रपटांत असलेली भव्यता घेऊन गणेश आचार्य मराठी चित्रपटसृष्टीत आले आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सुरु झालं असून, गणपती बाप्पांवरील गाण्य तब्बल हजार कलाकारांच्या सहभागाने हा सिनेमा चित्रीकरण सुरु असतानाच चर्चेत आला आहे.
मी मराठा एंटरटेन्मेंटच्या शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत झाला होता. आता मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर ‘देवा हो देवा’ हे गाणं चित्रीत करण्यात आलं. सुखविंदरसिंग यांनी गायलेलं हे गाणं मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. राहुल ठोंबरे आणि संजीव होवाळदार यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक गणेश आचार्यही नेहमीच्या शैलीत गाण्यात दिसणार आहेत. तीन दिवस या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं.
या गाण्यासाठी चाळीस फूट उंचीचा सेट उभारण्यात आला. गणपती बाप्पांची ३५ फुटी मुर्ती ठेवण्यात आली होती. तब्बल एक हजार कलाकारांचा या गाण्यात सहभाग होता. सेटवर ढोलताशा, झांजांचा गजर होत होता. तसंच सतारही वाजवली जात होती. या चित्रीकरणावेळी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते. तब्बल २५० मोठ्या घंटा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत.