म्युझिक लाँचचा दिमाखदार सोहळा रंगला
कोकणाच्या बॅकड्रॉपवर तयार करण्यात आलेल्या रहस्य आणि थरार असलेल्या ‘भूतकाळ’चे नुकतेच म्युझिक लाँच झाले. चित्रपटातले कलावंत, तंत्रज्ञ आणि गीत, संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटातल्या संगीताचा नजराणा सादर करण्यात आला.
साईराज मीडिया प्रस्तुत ‘भूतकाळ’चं दिग्दर्शन अनिल वाघमारे यांनी केलं आहे. नेहमीपेक्षा वेगळी हटके लोकेशन्स, प्रगत छायाचित्रण तंत्र आणि दिग्दर्शक अनिल वाघमारे हे स्वत: एक थ्रीडी इमेज तंत्रज्ञ असल्यामुळे अनेक वेगळे वास्तवाहून अकल्पित स्पेशल इफेक्ट यामुळे हा सिनेमा निश्चितच वेगळा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
‘भूतकाळ’च्या कथानकाला उत्तम संगीताची साथ लाभली आहे. यासाठी निर्माते दिग्दर्शक अनिल वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले असून हिंदीतला उगवता संगीतकार सिद्धार्थला त्यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. सिद्धार्थने हि जबाबदारी समर्थपणे पार पाडून उत्तम श्रवणीय गाणी ‘भूतकाळ’साठी संगीतबद्ध केली असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना हिंदीतला प्रख्यात गायक जावेद अली, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका बेला शेंडे आणि युवा गायक सिद्धार्थ शंकर महादेवन यांनी गायली आहेत. या गाण्यांचे आगळेवेगळे प्रमोशन उपग्रह वाहिन्यांवरून करण्यात येत आहे.
चतुरस्त्र अभिनेत्री हेमांगी कवी आणि ग्लॅमरस भूषण प्रधान हे दोघं या चित्रपटात एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळेल. त्यांच्यासह या चित्रपटात शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड, स्वाती भाभूरवडे यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शन,कथा, पटकथा,संवाद, कलादिग्दर्शन अनिल वाघमारे यांचे आहे.
मराठीत रहस्य आणि थरार असलेला भयपट येत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘भूतकाळ’विषयी कुतुहल निर्माण होणार आहे, त्यात संगीताने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.