गूढ आणि रहस्याची उकल करणार
निर्माते-दिग्दर्शक अनिल वाघमारे यांच्या साईराज मीडिया प्रस्तुत ‘भूतकाळ’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, गूढ आणि रहस्याची उकल करीत एक थरारक प्रवास यातून अनुभवता येणार आहे.

दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन अनिल वाघमारे यांचे असून नेहमीपेक्षा वेगळी हटके लोकेशन्स, प्रगत छायाचित्रण तंत्र आणि अकल्पित असे स्पेशल इफेक्ट ‘भूतकाळ’ची श्रीमंती वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चित्रपटाला अप्रतिम संगीत सिद्धार्थ अगरवालनं दिले आहे. गीतलेखन मंगेश कांगणे यांचं असून, सिद्धार्ध महादेवन, बेला शेंडे, जावेद अली यांनी गाणी गायली आहेत. चतुरस्त्र अभिनेत्री हेमांगी कवी–धुमाळ आणि तरुणींचा हॉट क्रश, चॉकलेट बॉय भूषण प्रधान अशी एक वेगळी फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट सध्या सिनेजगतात चर्चेचा विषय ठरला आहे. या दोन्ही कलावंतांच्या अभिनय क्षमतेला आव्हान देणारी कोकणच्या निसर्गरम्य पण गूढ पार्श्वभूमीवर उलगडणारी रहस्यमय भयकथा हे या सिनेमाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
चित्रपटात हेमांगी, भूषणसोबत शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड या सहकलावंतांची सोबत आहे. २ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा रहस्यमय, रोमांचक, थरारपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा ठाम विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे.

‘मराठी चित्रपटाला उत्तम प्रकारे स्वीकारलं जात आहे. मात्र, चांगल्या भयपटाची आजही उणीव आहे. भूतकाळ ही उणीव भरून काढणार आहे. या भयपटात लाईव्ह इफेक्ट्स – व्हीएफएक्स तंत्रज्ञानानं जोडले आहेत. त्यामुळे चित्रपटातल्या अनेक प्रसंगाच्या खरेपणामुळे मनात भीतीचं काहूर निर्माण होतं,’
-अनिल वाघमारे, दिग्दर्शक, भूतकाळ