बिभीषण कातळे, महेश बुलबुले यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन
तरुण शिल्पकार बिभीषण कातळे आणि रंगलेखक महेश बुलबुले याच्या चित्र-शिल्पांचे प्रदर्शन मुंबईतील जगप्रसिद्ध जहांगीर कलादालनात २८ फेब्रुवारीपासून सुरु झाल आहे. ६ मार्चपर्यंत सुरु राहणाऱ्या या कलाकृतींचा आस्वाद कलाप्रेमींना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत निःशुल्क घेता येईल.
ग्रामीण जीवनाशी नाते असणाऱ्या या दोन्ही कलावंतांच्या कलाकृतीत गावातील सौंदर्याचा आणि संस्कृतीचा आविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे.
बिभीषण कातळे यांचे जन्मगाव बीड जिल्ह्यातील, अंबेजोगाई तालुक्यातील ताडोळा हे आहे. मराठवाड्यातील छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन लहानपणापासून असलेल्या कलाध्यासामुळे त्यांना शेतीच्या मातीतूनच कलेची ओढ लागली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात शिल्पकलेचे शिक्षण घेत विविध प्रकारचे १४ अवार्ड मिळवले. त्यानंतर पुणे, मुंबई, बेंगलोर, गोवा, दिल्ली, इंदूर, हैदराबाद, भोपाळ अशा विविध ठिकाणी प्रदर्शन भारवून आपली कला रसिकांपुढे सादर केली. या प्रदर्शनांना प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांच्या कलाकृती जगप्रसिद्ध जहांगीर कलादालनात प्रदर्शित होत आहेत.
त्यांनी आजवर साकारलेल्या शिल्पकलाकृती अग्निजन्य खडक, गोल्ड मेटल आणि ब्लॅक मेटलच्या वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ‘बैल’ हा कुलदैवत वाटतो. शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर इमानदारीने काम करणाऱ्या बैलांबद्दलचा आदर ते आपल्या कलाकृतीत मांडणार असून, काळ्या पाषाणातून साकारलेल्या १७ कलाकृती ते रसिकांसमोर ठेवत आहेत. आधुनिक यंत्रयुगात इमानदार ‘बैल’ शेतकऱ्यांपासून दूर जाताना दिसत असला तरी कृषीसंस्कृतीत असलेले बैलाचे स्थान कदापि कमी होणार नाही, याचा विश्वास ते आपल्या शिल्पकलाकृतीतून अधोरेखित करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
या प्रदर्शनात महेश बुलबुले यांची चित्र प्रदर्शित होणार आहेत. महेश हे मूळचे सांगलीतील असून, त्यांचे कलाशिक्षण सांगलीमधील शांतिनिकेतन व पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात झाले आहे. त्यांच्या चित्रातील ‘नदी’ हा भक्ती, शक्ती, प्रामाणिकपणा तसेच समर्पणपणाची प्रचिती देणार आहे. पौराणिक कथांना जाणून, समजून, चिंतन, मनं करून त्यांनी हा विषय साकारला आहे. नंदीला शिवाचे वाहन समजले जाते. नम्र पहारेदार म्हणून ‘नंदी’ साकारताना त्यांनी शिवा अदृश्य ठेवला आहे, मात्र त्या अवकाशात त्याचे अस्तित्व अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही, हे या कलाकृतींचे खास वैशिष्ट्य आहे.
शिवाचा नियमित निळा रंग न वापरता उष्णरंगासोबत काळा सपाट रंग शिवाच्या ताकदीची, शक्तीची, भव्यतेची अनुभूती देते. त्यातील चंद्राचे विविध भावविश्व व चंद्राला वेढलेल्या रेषा जशा कलाकार व त्याची कला यातील अनुबंध दर्शवितो, तसेच नदीवरील वेढलेल्या रेषा, त्याचे वस्त्र किंवा आभूषणापेक्षा अखंड भक्तीरूपी जाळ्यात अडकलेला आहे, याची अनुभूती देतात. नंदीचे केलेले हे अलंकरण भारतीय चित्रकलाकृतीचा सुंदर नमुना आहे. त्यासाठी वापरलेली वस्त्रे, त्यावरील सुंदर लयबद्ध रेषा हे घटक चित्रात अधिकच गोडवा निर्माण करतात. ही सर्व चित्रे सकारात्मक ऊर्जा, धीर, चांगल्या गोष्टींबद्दलची आस्था रसिकांच्या मनात जागवतात.
चित्रांमधील रंगसंगती, सकारात्मक भाव, आनंद, भक्तिभाव, चैतन्य हे सारे कलाकृतीतील नंदीच्या बरोबर रसिकांना शिवाकडे अर्थात ऊर्जेकडे घेऊन जात असल्याचा अनुभव देतात.
