मत्स्यालयाच्या संकल्पनेवर आधारित असणारे भारतातील पहिले ‘कॅफे हायड्रो’ उपहारगृह मनोहर सकपाळ यांच्या ‘भागिरथी समूहाने’ निर्माण केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर ‘कॅफे हायड्रो’ या उपहारगृहाचे उदघाटन केन्द्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थान- भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबईचे संचालक व कुलगुरु डॉ. गोपाळ कृष्ण यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी आणि दिपक केसरकर उपस्थित होते.
मत्स्यालय संकल्पनेवर आधारित उपहारगृह ही कल्पनाच कौतुकास्पद आहे. त्यात मनोहर सकपाळ या मराठी उदंयोजकाने ‘कॅफे हायड्रो’ची निर्मिती केली याचा अभिमान वाटतो. अशा शब्दांत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले.
रुपेश सकपाळ यांच्या संकल्पनेतून ‘कॅफे हायड्रो’ उपहारगृह साकारले आहे. रुपेश सकपाळ यांनी फिशरीज या विषयात मास्टर्स पदवी मिळविली आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या सुशोभिकरणाचे कार्यदेखील रुपेश सकपाळ यांनीच केले आहे. १० हजार चौरस फूटाच्या जागेत उभारलेल्या या ठिकाणी ४२५ हूनअधिक मत्स्यालयाचे दर्शन होणार आहे. ३५० हून अधिकप्रजातींचे गोडे व खारे पाण्यातील मासे येथे पहावयास मिळणार आहेत. मत्स्य बोगदा हे एक या मत्स्यालयाचे वैशिष्ट्य असणार आहे. या पारदर्शी काचेच्या बोगद्यातून आपणांस विविध रंगी, आकाराचे मासे विहरताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे पाण्याखालील विविध ५० प्रजातींच्या वनस्पतीदेखील येथे पहावयास मिळतील. १५ ते २० प्रकारचे विविध सुंदर पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन हे एक येथील अनोखे वैशिष्ट्य होय. माणसांसारखे आवाज काढणारा काकाकुवा सगळ्यांचे लक्षवेधून घेतो. फूटभर लांबीच्या घोरपडी पाहून अंगावर काटा येतो. या उपहारगृहामध्ये माशांच्या प्रथिनांपासून तयार होणारे फास्टफूड चाखावयास मिळणार आहेत. यामध्ये फिश हॉटडॉग, फिशबर्गर, फिश मोमोज, फिश बावसारखे आशिया खंडातील नावीन्यपूर्ण चव असलेले फास्ट फूड उपलब्ध असतील.
रुपेश सकपाळ यांना त्यांचे बंधू सागर सकपाळदेखील सहाय्य करणार असून फिशरीज विषयात पदवी मिळविले १० निष्णाततज्ज्ञ या मत्स्यालयाची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी तैनात असतील.