सीबीडी फाऊंडेशन’तर्फे आयोजित ‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’ हा कार्यक्रम दिव्यांग व्यक्ती करत असलेला संघर्ष उजागर करावा आणि त्यांच्यासाठी कार्य करत असलेले स्त्री-पुरुष प्रकाशात यावेत यासाठी होणारा एक अल्पसा प्रयत्न आहे. सावरकर स्मारक संकुल, शिवाजी पार्क, मुंबई येथे रविवार, ३० एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. या प्रसंगी उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक प्रमुख पाहुणे असतील तर खासदार किरीट सोमय्या अतिथी असतील. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती असेल.
‘दिव्यत्वाची येथे प्रचिती’ हा कार्यक्रम दिव्यांगांसाठी आणि त्यांच्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्या आणि त्यांना सक्षम करणार्या समाजसेवींचा गौरव करण्यासाठी आहे. त्याची संहिता प्रसिद्ध लेखक-संपादक विजय कुवळेकर यांची आहे तर संगीत संयोजन कौशल इनामदार यांचे आहे.
‘सीबीडी फाऊंडेशन’ने आपले सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी निरलस भावनेने आता पर्यन्त सहा अनोखे कार्यक्रम सादर केले आहेत. तुकाराम ते तुकाराम हा पहिला कार्यक्रम भारतीय सिनेसृष्टीच्या शताब्दीपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आला होता. त्याचे प्रमुख अतिथिपद राज्यपाल के शंकरनारायणन यांनी भूषवले होते. दुसरा कार्यक्रम होता महाराष्ट्राचे मानकरी. ज्यांनी महाराष्ट्राची कीर्ती सातासमुद्रा पलीकडे पोचवली, अश्या २० मान्यवरांचा गौरव या प्रसंगी करण्यात आला होता. डॉ जयंत नारळीकर, डॉ अनिल काकोडकर, श्रीमती सुमित्रा महाजन आणि मुरलीधर भांडारे असे विविध क्षेत्रातील नामवंत त्याला उपस्थित होते.
‘सैनिक हो…’ हा तिसरा कार्यक्रम आपल्या देशाचे रक्षण अहोरात्र करणार्या वीर जवानांना वंदन करण्यासाठी आयोजित केला होता. चौथा कार्यक्रम होता सलाम पोलिस. आपले जीवन सुरक्षित राखणार्या पोलिस दलाला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाची संकल्पना करण्यात आली होती. ‘आनंदयात्रा’ हा सीबीडी फाऊंडेशनचा पाचवा कार्यक्रम सादर करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हजर होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना भारत रत्न हा बहुमान अर्पण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी ‘अटल रत्न’ हा सहावा कार्यक्रम मुंबई येथे रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ अनिल काकोकर यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमास विशेष रंगत आली.
सीबीडी फाऊंडेशन’ची स्थापना सर्जन, स्नेह आणि समर्पण या भावनांच्या समृद्धीसाठी पत्रकार दिलीप चावरे, निवेदक प्रदीप भिडे आणि व्यवस्थापन तज्ञ राजीव दोंदे यांनी केली आहे. सीबीडी फाऊंडेशनचे सर्व कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असतात. ‘दिव्यत्त्वाची येथे प्रचिती’ हा ‘सीबीडी फाऊंडेशन’चा कार्यक्रम या मालिकेतील सातवा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या विनाशुल्क सन्मानिका सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, येथे २९ आणि ३० एप्रिल २०१७ रोजी उपलब्ध असतील.