चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के सन्मानित
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र चाहूलतर्फे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने दिल्या जाणारा ‘रंगकर्मी सन्मान’ चंद्रकांत कुलकर्णी यांना तर ‘ध्यास सन्मान’ कांचन सोनटक्के यांना मंगळवारी एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आले.

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘मुंबईने मला नाव दिले, माझ्या कामाला वेग दिला. मुंबईत येऊन आज मला २९ वर्षाचा काळ लोटला. या काळात भले मी माध्यमांतर केले. जाहिरात असो वा सिनेमा सर्व क्षेत्रात मी काम केले. सिनेमासाठी काम केले, तरी मी मूळचा थिएटरचा माणूस आहे. पण मी अर्थार्जनासाठी मी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही. रंगकार्यासाठी मी जगतो त्यामुळे माझे रंगकर्मीपण अखेरपर्यंत टिकवून ठेवेन.’

नाटकाचा वापर थेरपी म्हणून करणाऱ्या सोनटक्के बाई आगळ्याच आहेत. त्यांचे कार्य चकीत करणारे आहे. त्यांनी नाटकांतून अपंगांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास जवळून बघितला आहे, असे कमलाकर नाडकर्णी यांनी सांगितले. आगामी वर्षभरात चंद्रकांत कुलकर्णी यांनी एक प्रायोगिक तर सोनटक्के यांनी गतिमंद मुलांच्या समस्यांवर नाटक सादर करावे, अशी अपेक्षा नाडकर्णी यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते शफाअत खान आणि प्रदीप मुळ्ये यांना संगीत अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ॲड फिझ या संस्थेचे महेंद्र पवार आणि विनोद पवार यांनी केले.
नलेश पाटील यांच्या कवितांचे वाचन
कवी नलेश पाटील यांच्या निसर्गकवितांचा पाऊस चैत्र ऋतूत बरसला. अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, सचिन खेडेकर, ऋग्वेदी प्रधान यांनी नलेश यांच्या कविता अतिशय शानदारपणे सादर केल्या. घन आभाळीचा तडकवा, निळा बटवा सुटला, वाऱ्याला जखमफुलांची, डोळ्याच्या पाणवठ्याला निळं आभाळ ठेपलं आदी गाजलेल्या कवितांचा आस्वाद रसिकांनी घेतला आणि त्यांना दिलखुलासपणे दाद दिली. यावेळी महर्षी दयानंद महाविद्यालयाने सादर केलेली ‘दप्तर’ एकांकिका सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर सुरांची मैफील रसिकांना अनुभवता आली.