झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये चौफेर फटकेबाजी
‘चला हवा येऊ द्या’ मंचाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असून, मराठी नाट्य सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडचे स्टार्ससुद्धा या मंचाच्या प्रेमात पडले आहेत. अनेक सुपरस्टार्सनंतर आता या मंचावर अजय देवगण, त्याची पत्नी अभिनेत्री काजोलसह येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणाऱ्या भागात दिसणार आहे.
यापूर्वी रितेश देशमुख, जॉन अब्राहम, वरुण धवन, सोनम कपूर, विद्या बालन, इरफान खान, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सनी या मंचावर हजेरी लावली. आता या यादीत आणखी एका स्टारचा समावेश झाला आहे. बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण त्याच्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर झळकणार असून त्याच्यासोबत काजोल, संगीतकार मिथुनसुद्धा दिसणार आहेत.
‘चला हवा येऊ द्या’च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या दोघांसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. सिंघमच्या भूमिकेत भाऊ कदमने तर जयकांत शिकरेच्या भूमिकेत सागर कारंडेने विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. याशिवाय थुकरटवाडीच्या कोर्टात अजय आणि काजोल दोघांनाही आरोपीच्या पिंज-यात बसवून त्यांच्यावर अनेक मजेदार आरोपही करण्यात आले. यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली.
या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. या दोघांचं हे मराठमोळं रुप येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणा-या ‘चला हवा येऊ द्या’च्या दोन्ही भागांमधून बघायला मिळेल.