जगण्याकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा संदेश
म्युझिक लॉन्च सोहळयाला चित्रपटातील कलाकार -गायक-संगीतकारांसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरही उपस्थित होते.
ब्लू व्हिजन एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘चालू द्या तुमचं’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला.
प्रवीण मधुकर तायडे, विशाल वसंत वाहूरवाघ आणि अमोल वसू यांनी ‘चालू द्या तुमचं’ या चित्रपटाची निर्मिती केली असून राजेश बाळकृष्ण जाधव यांनी दिग्दर्शन केलं आहे.

गीतकार अविनाश घोडके, हनुमंत येवले आणि आदिती जहागीरदार यांनी या चित्रपटासाठी गीत लेखन केलं आहे. त्यावर मधू भोसले आणि अनुराग-चिन्मय यांनी स्वरसाज चढवला आहे. कथानकाला गतीप्रदान करणारी विविध मूड्समधील चार वेगवेगळी सुमधूर गाणी ही या चित्रपटाची खासियत आहे.
यापैकी ‘दस का डझन पाँच का आधा…’ हे गीत विजय गटलेवार, मुकूंद नितोणे आणि विभावरी यांनी गायलं आहे, तर ‘२०-२० खेळ…’ हे गीत उत्तरा केळकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. ‘‘मन माझे हरवून बसले…’’ हे द्वंद्वगीत विजय गटलेवार आणि नेहा राजपाल यांनी गायलं आहे. ‘चालू द्या तुमचं…’ या शीर्षकगीताला आदर्श शिंदेने आपला भारदस्त आवाज दिला आहे. गणेश सातर्डेकर यांनी या गीताचं संगीतसंयोजन केलं आहे. नॉस्टेल्जिया स्टुडिओ आणि आजीवासन स्टुडिओ येथे या गाण्यांचं ध्वनीमुद्रण करण्यात आलं आहे. अवधूत वाडकर यांनी शीर्षकगीताचं साऊंड मिक्सिंग केलं आहे.
‘चालू द्या तुमचं’ हा सिनेमा जगण्याकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा संदेश देणारा आहे. मनोरंजनासोबतच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. ग्लोबलायझेशनची झळ आज शहरासोबतच खेडयांनाही बसू लागली आहे. या गदारोळात माणूस आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत हेच विसरू लागला आहे, हे या चित्रपटात पाहायला मिळेल. काही स्वार्थी व्यक्ती समाजाहितोपयोगी गोष्टी करण्याऐवजी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी समाजाचं अतोनात नुकसान करीत आहेत. अशा व्यक्तींना परावृत्त करणारी कथा या चित्रपटात सादर करण्यात आली आहे.
दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनीच ‘चालू द्या तुमचं’ची कथा-पटकथा लिहिली आहे. संभाजी सावंत यांनी संवादलेखनाची जबाबदारी पार पाडली आहे.
मिलिंद गुणाजी, विजय कदम, संदीप पाठक, निशा परूळेकर, मेघा घाडगे, अजय जाधव, उमेश मितकरी, वैशाली चांदोरकर, सुधीर सिन्हा, दिपज्योती नाईक, कमल आदिब आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असून विजय पाटकर, जयराज नायर, राहुल तायडे, मीरा जोशी यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका वठवली आहे. संतोष भोसले यांनी रंगभूषा, मनाली भोसले यांनी केशभूषा, तर मीनल भास्कर देसाई यांनी वेशभूषा केली आहे. केशव ठाकूर यांनी कलादिग्दर्शनाचं काम पाहिलं असून, प्रशांत नाईक यांनी या चित्रपटातील साहसदृश्यांचं दिग्दर्शन केलं आहे. दीपाली विचारे, जयेश पाटील आणि भरत जाधव यांनी ‘चालू द्या तुमचं’मधील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. सुदर्शन सातपुते यांनी संकलन केलं असून, छायांकन राजा फडतरे यांचं आहे. प्रवीण शशिकांत जगताप निर्मिती प्रमुख आहेत, तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.