‘चरणदास चोर’ला दिल्या शुभेच्छा
‘माझा शिष्य श्याम महेश्वरी मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक बनलाय, तर मला मराठी भाषा शिकावी लागेल. कारण, आता मला मराठी चित्रपटात काम मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही,” अशा खुमासदार शैलीत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

‘मी आजवर एकही मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे ‘चरणदास चोर’ हा मी पाहिलेला पहिला सिनेमा ठरेल. हिंदीच्या तुलनेत मराठी भाषेतील साहित्य उत्तम आहे. मराठीत खुप चांगले विषय हाताळले जातात. त्यामुळे मराठी सिनेमा हा जास्त आशयघन आहे. बॉलीवूड सिनेमांमुळे मराठी चित्रपटांना खूप संघर्ष करावा लागतो. पण, मला आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल आणि मराठी सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मी सध्या बॉलीवूड सिनेमे पाहाणं बंद केलंय. कारण, ते पाहताना मला सतत वाटत राहतं की, त्यातील एखादी व्यक्तिरेखा मी साकारली असती तर उत्तम झालं असतं. पण, तसं घडत नाही, याचं मला दु:ख होतं, अशी खंतही नीना गुप्ता यांनी व्यक्त केली.
युनीट प्रोडक्शन निर्मित ‘चरणदास चोर’ या चित्रपटाचे ट्रेलर आणि संगीत प्रकाशन नीना गुप्ता यांच्या करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी निर्मात्या दीपा महेश्वरी, क्रिएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे, संगीतकार रोहित मांजरेकर, चित्रपटात चरणदास चोर या मुख्य भूमिकेतील कलाकार सोलापूर-बार्शीचा नाट्यअभिनेता अभय चव्हाण, सोनम पवार, बालकलाकार आदेश आवारे, सिनेमॅटोग्राफर सुमीत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

रोमान्स, ॲक्शन, भव्य सेट्स, ग्राफीक्सचा प्रभावी वापर, भलीमोठी स्टारकास्ट आणि बीग बजेट असे समीकरण असलेल्या जमान्यात उत्तम कथानक आणि परिस्थितीजन्य, तार्किक-मार्मिक विनोदी असलेला चरणदास चोर हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.