स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’त साजरा होणार लग्नसोहळा
‘नकुशी’ या मालिकेत बग्गीवाला चाळीत एकटेच राहणाऱ्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या आहे. तिचं आता सौरभशी लग्न होणार आहे. या लग्नासाठी नकुशी, रणजित आणि समस्त चाळकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

अरूण होर्णेकर हे मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी वेटिंग फॉर गोदो, राशोमान, एक शून्य बाजीराव अशा अनेक नाटकांतून अभिनय, दिग्दर्शन केलं आहे. अतिशय हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची अॅब्सर्ड थिएटरपासून व्यावसायिक नाटकंही गाजली आहेत. गेली चार दशकं ते मराठी रंगभूमीवर निष्ठेनं काम करत आहेत. त्याशिवाय त्यांनी चित्रपट, मालिकांतूनही काम केलं आहे.
छबूकाका या भूमिकेविषयी होर्णेकर म्हणाले, ‘छबूकाका ही व्यक्तिरेखा बरीचशी माझ्यासारखी आहे. त्यामुळे मला भूमिकेसाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. मी प्रत्येक भूमिका आपलीशी करतो. त्यात स्वत:चं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. छबूकाका ही भूमिका छान आहे आणि त्याच्या विविध छटा साकारताना मजा येते.’
‘नकुशी या मालिकेचा विषय वेगळा आहे. मालिकेचं कथानक कुठेही रेंगाळत नाही. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, उपेंद्र लिमये अशी उत्तम टीम सोबत असल्यानं काम करायलाही धमाल येते. बाहेर फिरताना लोक जेव्हा छबूकाका म्हणून ओळखतात, तेव्हा छान वाटतं,’ असं होर्णेकर यांनी सांगितलं.