पेणमधील कासू गावात चित्रीकरण
‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’च्या बॅनरखाली तयार होणारा ‘कॉपी’ हा आगामी मराठी चित्रपट आजवर कधीही समोर न आलेला विषय मांडणारा आहे. या चित्रपटाचं दुसरं शेड्युल पेणमधील कासू या गावी सुरू आहे.
‘कॉपी’ म्हटलं की आपल्याला लगेच शाळेमध्ये परीक्षा देताना केली जाणारी कॉपी आठवते. या चित्रपटाचा विषयही या कॉपीला अनुसरून असून शिक्षण क्षेत्रातील कारभारावर प्रकाश टाकणारा आहे.

याबाबत दयासागर वानखेडे म्हणाले, “कासू गाव हे मुंबईपासून जरी जवळ असलं तरी एखाद्या खेडेगावासारखंच आहे. ‘कॉपी’ची कथा एका गावातील शाळेत घडत असल्याने आम्ही चित्रीकरणासाठी कासू गावातील शाळा निवडली. या शाळेच्या माध्यमातून देशभरातील बऱ्याच शाळांमध्ये घडणारा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकार दरबारी मिळणारी शाळेची मान्यता, ग्रँड मिळवण्यासाठी होणारी धडपड, यात भरडला जाऊन बिनपगारी काम करणारा शिक्षक, पगार न मिळाल्याने मुलांना शिकवण्यापेक्षा खासगी शिकवण्यांकडे वाढलेला शिक्षकांचा कौल आणि शिक्षणसम्राटांचं राजकारण या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांभोवती या चित्रपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे.”
या चित्रपटात शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत हेमंत धबडे म्हणाले, “हा चित्रपट म्हणजे केवळ उपदेशाचे डोस नसून यात प्रेक्षकांना वास्तव पाहायला मिळेल. याच कारणामुळे चित्रीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा सेट न उभारता आम्ही रियल लोकेशनवर ‘कॉपी’चं चित्रीकरण करत आहोत. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा परिणाम मुलांवर होत आहे. याचा मुलांच्या भविष्यावर होणारा परिणाम याचा आढावा या चित्रपटाच्या माध्यमातून घेणार आहे. आज खेडोपाडी जो प्रकार सुरू आहे त्याचं प्रतिबिंब ‘कॉपी’मध्ये पाहायला मिळेल.”
‘कॉपी’ करून पास होणाऱ्या विद्यार्थी जीवनात कधीच आपलं लक्ष्य साध्य करू शकणार नाहीत असं मत निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “माझं शिक्षण फार कमी आहे; परंतु आज मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय. बरीच मंडळी माझ्यासोबत आहेत. कठोर मेहनतीच्या बळावर मी इथवर पोहोचलो आहे. त्यासाठी सुरुवातीला अत्यंत खालच्या दर्जाची कामं करायलाही मी मागे पुढे पाहिलं नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचा उद्देश आहे. शिक्षण असल्यावर पैसा मिळतोच, पण त्यासोबतच मान-सन्मानही मिळतो. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असायला हवी. ‘कॉपी’ ही पळवाट आहे. पळवाटेने जाऊन कोणीही व्यक्ती मोठी होत नसते ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेतली तर ‘कॉपी’ हा प्रकार मुळापासून नष्ट होईल.”
आजवर बऱ्याचदा विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे या चित्रपटात खूपच वेगळ्या भूमिकेत आणि लुकमध्ये आहे. याबाबत अंशुमन म्हणाला, “आजवर बऱ्याचदा विनोदी भूमिकेत प्रेक्षकांसमोर आलो, पण दयासागर आणि हेमंतजी यांनी ‘कॉपी’मधील भूमिका देऊन माझ्यातील कलाकाराला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. आजवर मी बऱ्याच प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगवल्या, पण शिक्षकाची भूमिका प्रथमच साकारतोय. यासाठी दाढी वाढवली आहे. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारा असा हा शिक्षक आहे.”
अंशुमनच्या जोडीला जगन्नाथ निवंगुणे यांनीही या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ‘लक्ष्य’ या मालिकेतील पोलिसी भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या जगन्नाथ देखील प्रथमच शिक्षक साकरत आहेत. अंशुमन आणि जगन्नाथ यांच्या जोडीला कमलेश सावंत, मिलिंद शिंदे, विपुल साळुंखे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मुदशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतीक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत या कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.
‘कॉपी’ची मूळ संकल्पना चित्रपटाचे निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. त्यावर हेमंत धबडे, दयासागर वानखेडे आणि राहुल साळवे यांनी ‘कॉपी’ची कथा लिहिली असून हेमंत आणि दयासागर यांनी पटकथा लिहिली आहे. यापूर्वी बऱ्याच चित्रपटांचं लेखन करणाऱ्या दयासागर यांनी या चित्रपटासाठी संवादलेखनही केलं आहे. राहुल साळवे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयींनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. सँटिनिओ टेझिओ या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. संदिप कुचिकोरवे या चित्रपटाचे कलादिग्दर्शक असून रविंद्र तुकाराम हरळे कार्यकारी निर्माते आहेत. रॉकी हारळे या चित्रपटाचे कोरिओग्राफर असून जय घोंगे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.