डी. एस. राणे यांचे चित्र प्रदर्शन सुरू
ज्येष्ठ चित्रकार डी. एस. राणे यांच्या “इनर व्हॉइस” हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत २६ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ते १ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना नि:शुल्क बघता येईल. मुंबई येथील जेजे स्कूल ऑफ आर्ट इथे त्यांनी आपले कलेचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून राणे हे गेली चार दशके चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. फिगरेटिव्ह आर्ट या शैलीमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे.
राणे यांच्या चित्रांचे वैशिष्टय म्हणजे मानवी मनात सुप्तावस्थेत असलेल्या मूक भावनांना ते कॅनव्हासवर जिवंत करतात. त्यांच्या चित्रातील माणसे ही काहीशी रांगडी आणि ग्रामीण बाज असलेली वाटली तरी ती जगभरातील मानवी भावभावना, जीवनातील गुंतागुंत यांचा लेखाजोखा मांडतात. त्यामुळे त्यांची चित्रे बघून कला रसिक “जगात कुठेही राहणारा माणूस सारखाच!” या वाक्याचा पुनरप्रत्यय येतो.
राणे यांच्या चित्रांमधील रंग हे त्यातील माणसांप्रमाणेच जिवंत आहेत आणि ते रसिकांशी संवाद साधतात. ब्रशचे उन्मुक्त फटकारे कॅनव्हासला जिवंत करतात. त्यामुळे राणे यांची प्रत्येक कलाकृती बोलकी ठरते.
गेल्या चार दशकांच्या कला प्रवासात राणे यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मानसन्मान प्राप्त केले आहेत. त्यांची चित्रे साऊथ कोरिया, जपान, हॉंगकॉंग, लंडन व इतर देशांमध्ये प्रदर्शित झाली आहेत. ललित कला आकादमीतर्फे आयोजित कॅम्पमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला आहे. दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संग्रहमध्ये राणे यांची चित्रे समाविष्ट आहेत. त्याचबरोबर पॅरिस, सिंगापूर येथील गॅलरीजच्या संग्रहात त्यांची चित्रे समाविष्ट आहेत. भारत, हाँगकाँग, सिडनी, यूके, यूएसए, कॅनडा, पॅरिस, प. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, यूएई, दुबई इटली व जगभरातील इतर खाजगी संग्रहकांनी राणे यांची चित्रे संग्रहित केली आहेत. त्यांची भारतात आणि परदेशात आतापर्यंत १०० हून अधिक एकल आणि समूह प्रदर्शने झाली आहेत.
मानवी भावनांचा कॅनव्हासवरीलआविष्कार बघण्यासाठी चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.