दीपक रमेश पाटील यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध चित्रकार दीपक रमेश पाटील यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘आठवणीतील सोनेरी क्षण’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे येत्या १७ एप्रिल ते २३ एप्रिल २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे चित्रप्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

दीपक यांच्या अनुभवविश्वातून गवसलेल्या संकल्पना कुंचल्याच्या माध्यमातून चित्रबद्ध होताना पाहणे म्हणजे पर्वणीच. वॉटरकलर, अेक्रेलिक, ऑईलकलर या आणि अशा विविध रंगमाध्यमांतून काम करणाऱ्या पाटील यांचा निसर्गचित्रणात विशेष हातखंडा दिसून येतो. आपल्या खास सौंदर्यदृष्टीने ते बारकावे टिपतात. खोपोली येथील त्यांच्या स्टुडीओमध्ये त्यांचं एक अनोखं कलाविश्व पाहायला मिळते.

अलंकारिक वस्तू, नक्षीकाम, कोरीव काम असलेल्या अनेक वस्तू त्यांनी चिकाटीने जमा केल्या आहेत. आपल्या पूर्वजांनी साकारलेल्या कलाकृतींचे जतन तसेच संवर्धनासाठी पाटील सतत प्रयत्नशील असतात. जुन्या प्रसिद्ध चित्रकारांच्या मूळ पेंटींग्सही पाटील यांच्या संग्रही आहेत. त्यांना छायाचित्रणाचा छंद आणि फिरस्तीची आवड असून भटकंतीदरम्यान विविध भागातील जीवनशैली ते छायाचित्रांतून टिपतात. अभ्यासू वृत्तीचे दीपक कलाक्षेत्रातील नामवंताशी नाते टिकवून आहेत. सीमेपल्याडच्या चित्रकारांच्या शैली अभ्यासण्यासाठी वाचन करणे त्यांना आवडते. विविध ऐतिहासिक चित्रशैलींपासून विख्यात चित्रकारांच्या चरित्रापर्यंतच्या पुस्तकांचा संग्रह त्यांचेकडे आहे. वेगवेगळे कलासंदर्भ या चतुरस्र चित्रकाराशी बोलताना माहीत होतात.

समाजभान असणाऱ्या या कलावंताने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कलाकृतींच्या विक्रीतून येणारे पैसे वेळोवेळी आपत्तीग्रस्तांना तसेच कँसरग्रस्तांसाठी दिले आहेत. अमेरिका स्थित ‘रे-मार-आर्ट’ या संस्थेतर्फ आयोजित स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून प्रथम क्रमांकाचा ‘बेस्ट ऑफ शो’ पुरस्कार २०१२ मध्ये पाटील यांच्या ‘संस्कार’ या शीर्षकखालील चित्राला मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे दीपक पाटील हे भारतातील पहिले चित्रकार ठरले. या स्पर्धेत जगभरातून शेकडो चित्रकारांनी सहभाग घेतला होता. त्यातून बारा चित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आलीे. पाटील यांच्या ‘हेल्पलेस’ या कलाकृतीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार उत्कृष्ट कलाकृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दीपक पाटील यांच्या ‘डियर वन टू माय डियर’ या कलाकृतीला ‘आर्ट फोनिक्स’ या संस्थेतर्फे ‘बेस्ट एन्ट्री’ हा पुरस्कार मिळाला. इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनमध्ये ‘मास्टर पेंटर्स ऑफ द वर्ल्ड’ हा सन्मान मिळाला आहे. इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनमध्ये पाटील यांनी आपल्या चित्रशैलीबाबत मार्गदर्शन केले आहे. यासह अनेक पुरस्कार पाटील यांच्या नावावर आहेत. नेहरू सेंटर, जहांगिर कलादालन तसेच राज्यातील बऱ्याच कलादालनांमध्ये त्यांची चित्रं प्रदर्शित झाली आहेत.
आपल्या गावाची बालपणीची, परंपरेची, संस्कारांची जाणीव मनात फुलविणाऱ्या कलाकृती पाहण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायलाच हवी. www.deepakpatil.in या संकेतस्थळावर त्यांच्या चित्रांची अद्ययावत माहीती उपलब्ध आहे.