रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत
‘ऑडबॉल मोशन पिक्चर’चा ‘देव देव्हाऱ्यात नाही’ हा मराठी सिनेमा लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज व्यक्तिमत्व असणारे विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये हे प्रसिद्ध कलाकार यात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
प्रवीण बिर्जे दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर प्रेरित असून, याची कथा, पटकथा तसेच संवाद आशिष देव यांनी लिहिली आहे. नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दोघांनी हिंदी तसेच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी हि जोडी पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. या दिग्गज जोडीबरोबरच यात अभिनेत्री रीना अगरवालदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अस्सल कौटुंबिक मेलोड्रामा असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होत आहे. ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा नेमका कोणत्या सत्यघटनेवर प्रेरित आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांना नक्कीच असेल!