७ जुलैपासून ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ चित्रपटगृहांत
मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. दिप्तीच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आगामी कंडिशन्स अप्लाय-अटी लागू हा मराठी चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.
संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शनचा डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा चित्रपट ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिप्ती ‘आरजे’ स्वरा हळदणकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘आरजे’च्या भूमिकेत शिरलेली दिप्ती सांगते की, ‘आरजे’ ची भूमिका ही चॅलेंजिंग व तितकीच इंटरेस्टिंग असते. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते.
या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पहाते यावर कंडिशन्स अप्लाय हा सिनेमा भाष्य करतो.
कंडिशन्स अप्लायमध्ये दिप्ती देवीसोबत सुबोध भावे, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय पवार यांचे आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे. सचिन भोसले व अमोल साखरकर चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ कार्यकारी निर्माते आहेत. ७ जुलैला कंडिशन्स अप्लाय सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

दिप्ती बनली रेडिओ जॉकी
on: In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंत