‘रघुकुल’च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय… पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सुर छेडतेय… कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपतीबाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय. असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!

अवयव दान जीवन दान हे घोष असलेल्या या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत इयत्ता दुसरी ते चौथी… पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अवयवदान, बेटीबचाव, बालमजुरी, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, पर्यटनस्थळांची निगा, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, पाण्याखालचे जग आदी विषयांवरील चित्रं रेखाटली. विद्यार्थांमधील उत्साह, विषयाची जाण आणि कल्पकता पाहून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक विभागाचे परिक्षक अवाक झाले.

मोठ्या गटात यशोधन विचारे या एस. के पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतानाचे चित्र प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. मधल्या गटात टिळकनगर विद्यामंदिराच्या समृद्धी शुक्ल या विद्यार्थिनीने आणि लहान गटात रॉयल इंटरनॅशलन स्कुलच्या गौरव तोंडवळकरने प्रथम क्रमांक पटकावला. तीनही गटांत मिळून एकूण ३८ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे सामाजिक भान जागृत व्हावे, आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना मुलांमध्ये रुजविण्यासाठी चित्रकलेचा उपयोग करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांपर्यंत हे सर्व सामाजिक संदेश गेल्याने उपक्रमाचा हेतू साध्य झाला व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. त्यामुळे मनाला खूप समाधान प्राप्त झाले असे या उपक्रमाचे व स्पर्धेचे प्रमुख अमोल पाटील यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. साईकृपा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष श्री जितेंद्र राणे यांनी आर्थिक सहकार्य करून विद्यार्थ्यांसाठी जास्तीतजास्त बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले. तसेच गद्रे बंधू , होम रिवाईज यांचेसुद्धा सौजन्य लाभले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे व श्यामसुंदर सोन्नर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर तिखे – निरीक्षक चित्र व शिल्प महाराष्ट्र राज्य, विश्वनाथजी राणे – नगर सेवक, कालाध्यापक संघाचे राज्य पदाधिकारी विलास ससाणे, जिल्हा अध्यक्ष दिगंबर बेंडाळे, जितेंद्र राणे, सी.आर.पाटकर, गुरुदत्त लाड उपस्थित होते.
नारायण महाजन, शेखर पाटील, सुवर्णा मॅडम व कला शिक्षकांनी सहकार्य केले.