डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष उपस्थिती
एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे ‘ऑनस्क्रीन’ संभाजी महाराज साकारतानाच पडद्यामागेही शंभूराजांचं जीवनचरित्र जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत संभाजी महाराजांचा ३२९ वा बलिदान स्मरणदिन तालुका शिरूर येथील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे साजरा करण्यात आला.
मृत्युंजय अमावस्या म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्या ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॅा. अमोल कोल्हे, शंतनू मोघे (शिवाजी महाराज), स्नेहलता वसईकर (सोयराबाई), पल्लवी वैद्य (पुतळाबाई), प्राजक्ता गायकवाड (यसूबाई), दिग्दर्शक विवेक देशपांडे, कार्तिक केंढे, निर्माते डॅा. घनश्याम राव, छायालेखक निर्मल जानी, क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे, कार्यकारी निर्माते समीर कवठेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीला महाअभिषेक करण्यात आला.
पवित्र मंत्रोच्चारांच्या जयघोषात संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॅाप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मूक पदयात्रा काढण्यात आली. शिवकालीन पोवाड्यांनी दुमदुमलेल्या वढूमध्ये शंभूराजांच्या समाधीची पूजा करून शासकीय मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुरंदर ते वढू बु. भव्य पालखी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले.