ऑडिओ सीडीच्या रूपात लवकरच येणार
कविवर्य कुसुमाग्रजांची उत्तरकविता आणि तीही डॉ. श्रीराम लागू यांच्या आवाजात, ही पर्वणी लवकरच ऑडिओ सीडीच्या रूपात उपलब्ध होणार आहे.
कविता लिहायला जशी प्रतिभा लागते तशीच ती वाचायलाही. डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या प्रतिभावंत नटाच्या आवाजात कुसुमाग्रजांची कविता ऐकणे यासारखा आनंद नाही. “आम्ही नट म्हणजे नुसते लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे,” असे म्हणणाऱ्या या नटसम्राटाने आपल्या उमेदीच्या काळात ‘नटसम्राट’मधील तात्यासाहेबांची काव्यमय स्वगते मराठी रसिकांच्या अंतर्मनात पोहोचवली होती. आता तो पुन्हा एकदा नव्या उमेदीने कुसुमाग्रजांच्या कविता घेऊन येतो आहे.
कवी कुसुमाग्रज आणि नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू या दोन प्रतिभावंतांच्या कलेतून जीवनाकडे अधिक प्रगल्भ दृष्टीने पाहण्याची ऊर्मी श्रोत्यांना मिळू शकणार आहे. हा दुग्धशर्करा योग घडवून आणण्याची कल्पना रेणुका माडीवाले यांची. दीपा लागू आणि रेणुका माडीवाले यांच्या नियोजनबद्ध प्रयन्तांतून या कवितांचे ध्वनिमुद्रण साकार झाले आहे.
रिअलायजेशन्स मीडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने हे ध्वनिमुद्रण होऊ शकले. संगीतकार नरेंद्र भिडे यांनी यावर सांगीतिक संस्कार केले आहेत. प्रास्ताविक गौरी लागू यांच्या आवाजात आहे. ही प्रक्रिया डॉ. लागू नव्वदीत प्रवेश करत असतानाच्या दिवशी १६ नोव्हेंबर २०१६ला पूर्ण होत आहे. कुसुमाग्रज आणि डॉ. लागू यांचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन यांच्यामार्फत ही ऑडिओ सीडी डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्या ऑडिओ बुक्स प्रकल्पाची ही सुरुवात आहे.
‘ऑडिओ बुक्स’ या नावाने नसला तरी ध्वनिफितीच्या रूपाने मराठी साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पॉप्युलर प्रकाशनाने यापूर्वी केला होता तो नाटककार विजय तेंडुलकर त्यांच्या ‘सफर’ आणि ‘नियतीच्या बैलाला’ या दोन नाटकांच्या रूपाने. पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याआधी आणि रंगमंच सादरीकरणाच्याही आधी तेंडुलकरांची ही दोन नाटके पॉप्युलर प्रकाशनाने खुद्द तेंडुलकरांच्याच आवाजात ध्वनिफितींच्या रूपाने प्रकाशित केली होती. डॉ. लागूंच्या आवाजातील कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ऑडिओ सीडी हे त्याच पाऊलवाटेवरील पुढचे पाऊल ठरावे.