महाराष्ट्राच्या तांबड्या मातीचा आणि मराठी संस्कृतीचा जयघोष करणारा ‘एक आमचा बाणा’ हे गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त हे गाणे संगीतकार आशिष मोरे यांनी सादर केले.
अश्वरथ क्रिएशन प्रस्तुत ह्या गाण्याचे बोल, संगीत आणि स्वर आशिष मोरे यांचा असून, या गाण्याचे संगीत संयोजन केदार भागवत यांचे आहे. समीर आडके यांनी दिग्दर्शन केले असून, गजानन सुतार यांची सिनेमोटोग्राफी असलेल्या या गाण्यात अस्सल मराठी बाज दिसून येत असून, महराष्ट्राच्या कणाकणात वसलेली जाज्वल्य संस्कृती या गाण्यात पाहायला मिळत आहे. आशिष मोरे यांचे नाव ‘काटा किररर्र’ या सुप्रसिद्ध गाण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. आदर्श शिंदे याच्या आवाजातील या सुपरहिट गाण्याला रसिकांनी चांगलेच पसंत केले असून, ‘एक आमचा बाणा’ या महाराष्ट्राच्या गौरवगीतालादेखील रसिक असाच प्रतिसाद देतील अशी आशा आशिष मोरे यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे नवीन होतकरू कलाकारांना एकत्र घेऊन या गाण्याचे सादरीकरण आशिष मोरे यांनी केले आहे.
या गाण्यात महाराष्ट्राची कन्या आणि भारताची धावपटू ललिता बाबरची छबी आपल्याला पाहायला मिळणार असून, ह्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वास्तविक जीवनात असणा-या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.