रुजुता प्रॉडक्शन आणि टेरॅकॉम एंटरटेंनमेंटची निर्मिती
‘मिस्टर अँन्ड मिसेस’ आणि ‘स्ट्रोबेरी’ या नाटकाच्या यशानंतर निर्माते नरेन चव्हाण, अभिजीत साटम व रुजुता चव्हाण हे रुजुता प्रॉडक्शन आणि टेरॅकॉम एंटरटेंनमेंटच्या बॅनरखाली ‘एक शून्य तीन’ ही नवीन नाट्यकृती रंगभूमीवर घेऊन येत आहेत.
सुदीप मोडक लिखित या रहस्यमय थरारक नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर व सुदीप मोडक करीत असून, या नाटकात सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर, गुरुराज अवधानी, संजय देशपांडे, सागर आठलेकर, नम्रता कदम, सुदीप मोडक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘एक शून्य तीन’ ही महिला हेल्पलाईन आहे. शासनाने खास महिलांच्या सुरक्षेसाठी हा नंबर दिला आहे. या हेल्पलाईन नंबरचा या नाटकात फक्त सूचक म्हणून वापर करण्यात आला असून, नाटकाच्या निमित्ताने हा नंबर प्रेक्षकांच्या लक्षात राहावा, हा हेतू असल्याचं निर्माता अभिजीत साटम यांनी सांगितले आहे.
‘एक शून्य तीन’ हे नाटक मात्र प्रत्यक्षात एका वेगळ्याच धाटणीचं आहे. यात रहस्य व थरार आहे. नाटकात दोन दशकापूर्वी हरवलेल्या पण शोध न लागलेल्या मुलीची केस पुन्हा तपासासाठी बाहेर काढली जाते. त्यातून जे धक्कादायक सत्य बाहेर येतं ते प्रत्यक्षात या नाटकात पाहायला मिळेल.
या नाटकात अभिनेता सुमीत राघवन पत्रकार आणि रिसर्चरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बडी दूरसे आये है’ या लोकप्रिय मालिकेत व्यस्त असलेला हा अष्टपैलू अभिनेता ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाची बहार उडवायला सज्ज झाला आहे आणि त्याला साथ देत आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधली मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेनंतर अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रथमच या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. ती या नाटकात कम्प्युटर एक्स्पर्टच्या भूमिकेत दिसणार आहे. गुरुराज अवधानी हे ज्येष्ठ कलाकार बर्याच कालावधीनंतर या नाटकातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास येत आहेत. तसेच या नाटकाचे लेखक – दिग्दर्शक सुदीप मोडक हे देखील या नाटकात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
पार्श्वसंगीत रोहीत प्रधान, नेपथ्य नीरज शिरवईकर, प्रकाशयोजना जयदीप आपटे, वेशभूषा दीपा मेहता, रंगभूषा संदीप नगरकर यांची असून व्यवस्थापक अमित सुर्वे हे आहेत. सध्या या नाटकाची तालीम जोरात सुरू असून येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येत आहे.