प्रेमगीताच्या रेकॉर्डिंगने झाला मुहूर्त
उच्चशिक्षित किशोर सोनवणे आणि अंकुश हारकाळ हे तरुण एकत्र येऊन अनन्या मुव्हीज चित्रपटनिर्मिती संस्थेअंतर्गत ‘फक्त एकदाच’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. विनय सांडिल्य दिग्दर्शित या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अमन त्रिखा यांच्या आवाजातील एका प्रेमगीताच्या रेकॉर्डिंगने करण्यात आला.
अमन त्रिखा यावेळी म्हणाले की, खरंच खूप सुंदर असं हे गाणं आहे. असं गाणं क्वचितच गायला मिळतं. हे गाणं फक्त रोमँटिक नसून मराठीतलं पहिलं लव्ह अँथम ठरणार आहे, कारण प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हे गाणं प्रेमाची भेट असणार आहे. एक प्रियकर आपल्या प्रियसीला आपले प्रेम या गाण्याच्या रुपात व्यक्त करतो हे यातून सांगण्यात आले आहे. प्रेमाचा छान संदेश यातून देण्यात आला आहे. आजवर मी हिंदीत इतकी गाणी गायली आहेत पण मराठीत हे गाताना मला खूप मज्जा आली. विजय गमरे यांनी लिहिलेल्या या गाण्याला महेश – राकेश यांनी संगीत दिले आहे.’
दिग्दर्शक विनय सांडिल्य सिनेमाबद्दल सांगतात की, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला फक्त एकदाच तरी करून बघायच्या असतात. अशीच काहीशी गोष्ट ‘फक्त एकदाच’ या सिनेमाची आहे. आपल्या आयुष्यात आपण कधीही न ठरवलेल्या गोष्टीदेखील आपल्याला कराव्या लागतात, त्यामुळे कसे आपले जीवन बदलून जाते यावर हा सिनेमा बेतलेला आहे. अनिकेत विश्वासराव, कमलेश सावंत, अरुण नलावडे, जयदेव नायर, समीर खांडेकर, जयवंत भालेकर, डॉ. विलास उजवणे, ओंकार सोनावले, आकांक्षा जाधव यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. किशोर सोनवणे आणि अंकुश हारकाळ यांना मराठी सिनेमात काहीतरी नवीन करायचे होते म्हणून या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे.