सत्यजित वरेकर यांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन
सुप्रसिध्द रंगलेखक सत्यजित वरेकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘फोक गॅलोर हे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात २७ सप्टेंबरपासून सुरु होत असून, ते ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नंदीला पुजलं जातं तसंच त्याला भगवान शिवाचं वाहन म्हणून मान दिला जातो. हाच मनात घर करून बसलेला नंदी वरेकर यांनी गेलं एक तप कॅनवासवर विविध स्वरूपात साकार केला आहे.

रंगलेखक सत्यजित वरेकर यानी तैलरंग, एक्रिलिक, चारकोल, ऑईल पेस्टल्स, जल रंग अशा अनेक रंगांचा सुयोग्य वापर करून ही चित्रं साकार केली आहेत. आजपर्यंत अनेक समूह आणि एकल कला प्रदर्शनांमधून त्यांनी आपल्या चित्रकृती मांडल्या असून त्या कलारसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
अनेक राष्ट्रीय कलासंस्था आणि राज्यसरकारकडून त्यांच्या चित्रांना पुरस्कार प्राप्त झाले असून देश विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, संग्राहक आणि संस्थांच्या दालनांमध्ये त्याच्या चित्रकृती संग्रहित आहेत.