स्वप्निलच्या वाढदिवशी धमाकेदार प्रोमोशन!
‘मितवा’फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फुगे’ या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. धम्माल मस्तीने भरलेल्या या सिनेमाचे सांताक्रुज येथील लाईटबॉक्समध्ये मोठ्या उत्साहात मोशन पोस्टर आणि टायटल सॉंगचा टीजर लॉंच करण्यात आला. सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशींचा वाढदिवसदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

आपली ओळख करून देताना या दोघांनी स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी अशी आडनावांची अदलाबदल करून उपस्थितांची उत्कंठा वाढवली. त्यानंतर फुगे सिनेमाचे मोशन पोष्टर आणि सिनेमातील शीर्षकगीताचा टीजर सादर करण्यात आला. हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा असून आम्हांला या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची संधी मिळाली असल्याचे हे दोघे सांगतात.

फुगे सिनेमाच्या पोस्टरलाही कार्यक्रमात मोठी पसंती मिळाली. स्वप्नील- सुबोधचा याराना प्रथमच या मोशन पोष्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. हा मोशन पोष्टर पाहताना प्रथमदर्शनी स्वप्नील-सुबोध यांच्यातली मैत्री दिसून येते, मात्र त्यादरम्यान दोघांच्या हातावर गोंदलेली एकमेकांची नावे पाहिल्यानंतर ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्नदेखील उपस्थित होतो. शिवाय पोस्टरवरील या दोघांमधून उडत जाणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांमुळे हा सिनेमा नक्कीच एका वेगळ्या धाटणीचा असल्याचे समजून येते.
इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. शिवाय स्वप्नील आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या सिनेमाद्वारे जुळून आला असल्यामुळे येत्या २ डिसेंबर रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांसाठी दुहेरी मेजवानी घेऊन येणार आहे.