२१ मे रोजी दीनानाथ नाट्यगृहात १००वा प्रयोग
‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचं शिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आणि अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने शंभराव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाऊसफुल चालू आहे.
प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे या नाटकाने ९९ यशस्वी प्रयोग पार पाडले आणि लवकरच १०० वा प्रयोग मुंबई येथील दीनानाथ नाट्यगृहात साजरा होणार आहे. या नाटकाच्या यशात निर्माते लीना जुवेकर- दत्तगुप्ता व राहुल जुवेकर यांचा ही मोलाचा वाटा आहे. येत्या रविवारी २१ मे रोजी दुपारी ३.४५ वा. दीनानाथ नाट्यगृहात ‘ती फुलराणी’ च्या शंभराव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगणार आहे. या शंभराव्या प्रयोगासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. रसिकांना पुनर्प्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘ती फुलराणी’ च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा शतक महोत्सवी प्रयोग अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण ऊर्जा असलेल्या या फुलराणी’चा दरवळ उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित.
अॅडोनिस मल्टीमिडिया अॅण्ड एण्टरटेन्मेंट प्रा.लि’ निर्मित ‘ती फुलराणी’ या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी आणि प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत. सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे, अंजली मायदेव, मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे हे कलाकार आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.