वैष्णवी फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित व निर्माता अजय सूर्यवंशी यांचा पहिला मराठी चित्रपट ‘गच्चीवरची लव स्टोरी’चा मुहूर्त थाटात संपन्न झाला. दोन वेळा ऑलम्पिक पदक विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमारच्या हस्ते सदर चित्रपटाचा मुहूर्त नुकताच हॉटेल महाराणा, चेंबूर येथे पार पडला.
या वेळी भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केणेकर, अनिलभाई चव्हाण (चेअरमन, महाराणा ग्रुप), प्रशांत देशमुख (ट्रस्टी, गाडगे महाराज ट्रस्ट), गोरक्ष धोत्रे (अध्यक्ष , भाजपा चित्रपट कामगार आघाडी), ऍड राज पाटील (सुप्रीम कोर्ट), निर्माते अशोक तावडे, शेखर देसाई, अतुल ओव्हळ, हरीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताचे नाव सुवर्ण अक्षरात कोरणारा कुस्तीपटू सुशील कुमार याने वेळात वेळ काढून आपल्या मराठी चित्रपट निर्माता असलेला जिवलग मित्र अजय सूर्यवंशीसाठी चित्रपटाच्या मुहूर्तला हजिरी लावली.
‘गच्चीवरची लव्ह स्टोरी’ या चित्रपटाची कथा अमोल पाडावे यांची असून तेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. सदर सिनेमात नवीन कलाकार असले तरी, अजय सूर्यवंशी यांच्यासोबत आशिष व सानिया सिंग यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. दादरच्या गाडगे महाराज ट्रस्टच्या वतीने अनेक कर्क रोगी असणाऱ्या लोकांचे मोफत ईलाज केले जातात. त्यापैकी लाभार्थी असणाऱ्या काही हरहुन्नरी कॅन्सर ग्रस्त कलाकार असणाऱ्याना या सिनेमात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे निर्माते अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. यासाठी गाडगे महाराज ट्रस्टचे समन्वयक प्रशांत देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगे महाराज ट्रस्टच्या काही विद्यार्थांनी आपली कला प्रदर्शित करून, उपस्थितांची वाहवा मिळविली. मुहूर्ताच्या वेळी सुशील कुमारने चित्रपटातील सर्व टीमला शुभेच्छा देऊन, तो मराठी चित्रपटाचा मोठा चाहता असल्याचे सांगितले.
अजय सूर्यवंशी यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांच्या वैष्णवी फिल्म्स इंटरनॅशनल या संस्थेद्वारे लवकरच एक हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली जाणार असल्याचे अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. चित्रपटाचे शुटिंग, इतर कलाकारांची निवड झाल्याबरोबर लगेच सुरु होणार असल्याचे कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले पाटील यांनी सांगितले.