आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त गश्मिर महाजनीशी बातचित…
आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिन (२९ एप्रिल) आहे. आणि गेली पंधरा वर्ष स्वत:ची आपली डान्स एकेडमी असलेला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गश्मिर महाजनी हा एकमेव अभिनेता आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने मराठी डान्सिंग स्टार गश्मिर महाजनीशी केलेली ही बातचित…
नृत्याचे तू काही प्रशिक्षण घेतले आहेस का?
– डान्सची मला लहानपणापासून आवड होती. मला परदेशात नृत्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती. माझी बहिण वॉशिन्ग्टन डिसीमध्ये राहते. मी परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणं आर्थिकदृष्ट्या मला जमणार नाही हे तिला ठाऊक असल्याने, तिने ब्रिटनी स्पिअर्स आणि मायकल जॅक्सनसाठी ज्याने कोरीओग्राफी केलीय, त्या जगप्रसिध्द कोरीओग्राफर डॅरीन हॅन्सनच्या आठ डीव्हीडींचा संच मला एकेदिवशी पाठवला. हा डिव्हिडींचा संच कोरीओग्राफर्ससाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. बॅरनच्या डान्स क्लासला जे भाग घेऊ शकत नाहीत, अशा जगभरातल्य़ा डान्सर्ससाठी हा खास बनवण्यात आलाय. त्यातून मी अगदी एकलव्यासारखा डान्स शिकलो.
तुझ्या डान्स एकेडमीची सुरूवात कशी झाली?
– दहावी झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत काही तरी वेगळं करावं म्हणून मी पुण्यातच एक हिपहॉप डान्सचं वर्कशॉप घेतलं आणि त्याला 15-20 जणं आले होते. ह्या वर्कशॉपला शिक्षक असलेला मी, 15 वर्षांचा आणि माझे विद्यार्थी 22 ते 25 वर्षांचे असं काहीतरी मजेशीर चित्र पाहायला मिळालं होतं. तो वर्कशॉप एवढा चांगला झाला की, त्यात भाग घेतलेल्या लोकांनी मला पून्हा असे वर्कशॉप घेण्याचा आग्रह धरला. तू आम्हांला वर्षभर शिकवं, आम्ही येऊ असं त्यांनी सूचवलं आणि सहज टाइमपास म्हणून सुरू झालेले वर्कशॉप्सनी हळूहळू प्रोफेशनल रूप आकाराला घेतलं. अन् मगं माझ्या डान्स एकेडमीचा जन्म झाला. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या एकेडमीव्दारे वीस ते बावीस हजार लोकांना मी ट्रेन केलंय. आता आम्ही भारतीय शास्त्रीय नृत्यापासून ते सालसा आणि झुंबा पर्यंत अनेक नृत्यप्रकार शिकवतो. तीन वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी ह्या डान्स एकेडमीमध्ये शिकायला येतात.
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये तुझा आवडता डान्सिंग स्टार कोण आहे?
– मायकल जॅक्सन माझं दैवत आहे. त्याच्याहून मोठा डान्सिंग स्टार आजपर्यंत जन्माला आला नाही. आणि बॉलीवूडमधला माझा सर्वात जास्त आवडणारा डान्सिंग स्टार आहे, गोविंदा. माझ्या शालेय जीवनात त्यांना पाहूनच तर मी डान्स करायला शिकलो. एका अभिनेत्याला कायिक अभिनय करताना नृत्याचं अंग असणं किती गरजेचं आहे, त्यांना पाहून समजतं.
स्वत: कोरीओग्राफर असल्यावर चित्रपटात जेव्हा तूला इतर कोरीओग्राफर त्यांच्या तालावर ठेका ठरायला लावतात तेव्हा तू कम्फर्टेबल असतोस का?
– अर्थातच. मला असं वाटतं एक दिग्दर्शक दुस-या दिग्दर्शकाला जास्त समजून घेऊ शकतो. तसेच एक कोरीओग्राफर दूस-या कोरीओग्राफरकडून जास्त चांगला परफॉर्मन्स करवून घेऊ शकतो. अनेक कोरीओग्राफरना तर मला चांगला डन्स येत असल्याने मला अवघड डान्स मुवज द्यायला आवडते. प्रत्येक कलाकाराला कायिक आणि आंगिक असा दोन त-हेचा अभिनय करावा लागतो. कायिक आणि वाचिक अभिनयात नटाला जर नृत्याचे अंग असेल तर त्याचा कायिक अभिनयही ग्रेसफुल होतो.
यासंदर्भातला एखाद्या चित्रपटातला काही अनुभव शेअर करशील का?
– मी कान्हा चित्रपटाचे शुटिंग करतानाच्या दहीहंडीच्या गाण्याची मला आठवण येतेय. सर्वसाधारणपणे गाण्याच्या चित्रीकरणासाठी तीन दिवस ठेवले जातात. पण काही तांत्रिक कारणास्तव ह्या गाण्यासाठी एकच दिवस ठेवण्यात आला होता. खरं तर 12 ताासांची शिफ्ट होती. पण जागेची कमी वेळासाठी परवानगी मिळाली असल्याने 12 तासांऐवजी फक्त सहा तासात गाणे शूट करायचे होते. त्यावेळी मी चांगला डान्सर असल्याचा फायदा नृत्यदिग्दर्शक आणि निर्मात्याला झाला. बीना रिटेक्स होता. फक्त सहा कट्समध्ये ते संपूर्ण गाणे आम्ही 12 ते 6 ह्या सहा तासांमध्ये चित्रीत केले.