रेमो डिसोजाला दिला जोरदार ‘गावठी’ धक्का
प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲण्डी एक दिवस अचानक गायब झाला आणि एका चित्रपटाची निर्मिती करून खास ‘गावठी’ धक्का दिला.

रेमोने त्याला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले आणि तातडीने चित्रपट दाखविण्यासाठी सांगितले. पूर्णत: तयारीनिशी गेलेल्या ॲण्डीने रेमोला फिल्म दाखवली. ही फिल्म म्हणजे येत्या ३० मार्च रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ‘गावठी’.
फिल्म पाहून रेमोने ॲण्डीला घट्ट मिठी मारली. केवळ कोरीयोग्राफीच नव्हे तर उत्तम दिग्दर्शन आणि पटकथाही लिहिलेल्या चित्रपटातील इमोशन्स, रोमान्स, कॉमेडी आणि एकूणच फिल्म उत्तम झाल्याने रेमो भलताच खुष झाला. रेमोने आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून सिनेमाचे ‘दिसू लागलीस तू’ ह्या सध्या जोरदार व्हायरल झालेल्या गाण्याचे संगीत प्रकाशीत केले.
आनंदकुमार उर्फ ॲण्डी हा वयाच्या चौथ्या वर्षी कुटुंबासह तामीळनाडू येथून मुंबईत मुंलुंड येथे स्थायिक झाला. मुलुंडच्या वाणी विद्यालयात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. कारण, प्रभुदेवाच्या डान्स स्टाईलने झपाटलेला ॲण्डी रोज टीव्ही लावून एकलव्याप्रमाणे गुरू प्रभुदेवाकडून नृत्याचे धडे गिरवत होता. रोज सकाळ-संध्याकाळ केवळ अंगात संचारल्याप्रमाणे ॲण्डी नाचतच राहायचा.
चार वर्षे त्याने भरपूर स्ट्रगल करून कसेबसे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा यांच्या ग्रुपमध्ये साईड डान्सर म्हणून स्थान मिळविले. पण, नंतर ॲण्डीने मागे वळून पाहिलेच नाही. साईड डान्सर, डान्स ट्रेनर, असिस्टटन्ट कोरीयोग्राफर ते बड्या सुपरस्टार्सना तो व्यक्तिगत डान्स स्टेप शिकवू लागला. गुरू रेमो डिसोजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ए बी सी डी, ए बी सी डी-२ आणि फ्लाईंग जाट या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. संपूर्ण आत्मविश्वास आल्यावर त्याने कथालेखक आणि निर्माते सिवाकुमार रामचंद्रन यांच्या ‘गावठी’ ह्या कथेवर पटकथा रचली आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. गावठी… हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास देणारा, मनोरंजनाचा पावर पॅक असलेला ‘गावठी’ हा चित्रपट येत्या ३० मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.